

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी गावानजीक दत्त मंदिरासमोर दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती महामार्गालगतच्या तब्बल २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार सतीश निवृत्ती पाटे (वय २९, रा. पोलादपूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेल्या अक्षता अरविंद कवडे (२८, रा. चिपळूण) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पाटे व अक्षता कवडे हे दोघे दुचाकीवरून पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने प्रवास करीत होते. रविवारी सकाळी सुमारे ६.४० च्या सुमारास खवटी गावानजीक दत्त मंदिरासमोर दुचाकीवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर दुचाकी महामार्गाच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधामची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी अक्षता कवडे तसेच सतीश पाटे यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीत सतीश पाटे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.