Pramod Jathar Pudhari
रत्नागिरी

LPG Supply Ratnagiri | रत्नागिरीत घरगुती एलपीजी पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Pramod Jathar Ratnagiri District Collector

राजापूर : युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले तात्पुरते निर्बंध रत्नागिरी जिल्ह्यासाठी तातडीने शिथिल करून पुरवठा पूर्ववत करावा. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन घरगुती एलपीजी जोडण्यांना त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दोन रिफिल एलपीजी सिलेंडरमधील किमान कालावधी ४५ दिवसांचा निश्चित करण्यात आला असून, नवीन घरगुती एलपीजी जोडण्यांवरही तात्पुरते निर्बंध लागू आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नागरिकांनी पारंपरिक लाकूड इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करून स्वयंपाकासाठी एलपीजीचा स्वीकार केला आहे. याशिवाय ग्रामीण भागात संयुक्त कुटुंब पद्धती असल्याने अनेक घरांमध्ये सदस्यसंख्या अधिक आहे. त्यामुळे एका सिलेंडरवर ४५ दिवसांचा कालावधी काढणे अनेक कुटुंबांसाठी शक्य होत नसल्याचे आमदार जठार यांनी नमूद केले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोकणातील होळी आणि विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे व इतर शहरांत वास्तव्यास असलेले हजारो चाकरमानी गावी परततात. त्यामुळे घरगुती एलपीजी सिलेंडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात नवीन एलपीजी जोडण्या आणि रिफिल सिलेंडरची आवश्यकता अधिक भासते.

या पार्श्वभूमीवर ग्रामीण ग्राहकांसाठी दोन रिफिल सिलेंडरमधील ४५ दिवसांचा कालावधी कमी करून पूर्वीप्रमाणे करावा किंवा किमान २५ दिवसांचा निश्चित करावा. तसेच सर्व अधिकृत एलपीजी वितरकांना नवीन घरगुती एलपीजी जोडण्या देण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार जठार यांनी केली आहे.

यासंदर्भात पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच संबंधित तेल विपणन कंपन्यांशी समन्वय साधून रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांना तातडीने दिलासा मिळेल, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT