रत्नागिरी

Lote MIDC water crisis | लोटे औद्योगिक वसाहतीवर पाणीटंचाईचे गंभीर संकट; ४८ तासांत उद्योग ठप्प होण्याची भीती

सध्या लोटे औद्योगिक वसाहत कोयना धरणाच्या अवजलावर अवलंबून आहे

पुढारी वृत्तसेवा

खेड : लोटे औद्योगिक वसाहत आणि परिसरातील १९ गावांवर सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असून परिस्थिती कायम राहिल्यास पुढील ४८ तासांत औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता असल्याचा इशारा लोटे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी दिला. लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योग भवन येथे शुक्रवारी १९ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी असोसिएशनचे सचिव राजकुमार जैन, संचालक राजेश तिवारी, किसन चव्हाण तसेच घरडा कंपनीचे व्यवस्थापक आर. सी. कुलकर्णी उपस्थित होते.

राज आंब्रे यांनी सांगितले की, औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) सध्याच्या परिस्थितीत पाणीपुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे उद्योजकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. १८) जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या बैठकीस जलसंधारण विभाग, एमआयडीसी, जिल्हा परिषद तसेच इतर संबंधित शासकीय यंत्रणांचे अधिकारी प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

लोटे औद्योगिक वसाहतीतील सुमारे २० हजार कर्मचारी व कामगार तसेच कर्मचारी वसाहतींसाठी किमान पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावर नजीकच्या धरणातून टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे आंब्रे यांनी सांगितले.

सध्या लोटे औद्योगिक वसाहत कोयना धरणाच्या अवजलावर अवलंबून आहे. मात्र या व्यवस्थेला पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे उद्योजकांनी नमूद केले. वाशिष्ठी नदीवरील फरशी तिठा येथे कोल्हापूर टाईप बंधारा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन सहा ते सात वर्षे उलटली, तरी शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याच्या भीतीमुळेही या प्रकल्पाला विरोध झाल्याचे आंब्रे यांनी सांगितले.

सध्याची परिस्थिती कोविड लॉकडाऊनपेक्षाही अधिक गंभीर असल्याचे सांगताना आंब्रे म्हणाले की, उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर असून परिसरातील हजारो कामगारांच्या रोजगारावर संकट आले आहे. गॅसच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे आधीच कंत्राटी कामगारांची संख्या कमी झाली असून पाणीटंचाईमुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. घरडा कंपनीचे व्यवस्थापक आर. सी. कुलकर्णी यांनी सांगितले की, पाणीटंचाईमुळे कंपनीने सुमारे ८० टक्के उत्पादन बंद केले असून केवळ २० टक्के कर्मचारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यरत ठेवले आहेत. पाण्याच्या स्वतंत्र योजना उभारणे उद्योगांसाठी सध्या शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोळकेवाडी धरणातून पाइपलाइन उभारून वाशिष्ठी नदीलगतच्या औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये पाणी सोडण्याचा पर्याय शासनाने तातडीने विचारात घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच राज्य सरकारने लोटे औद्योगिक वसाहत, खेड तालुका आणि पंचक्रोशीतील गावांवर ओढवलेल्या पाणीबाणीची गंभीर दखल घेऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उद्योजकांनी केली. दरम्यान, लोटे पंचक्रोशीतील गावांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू असून परिसरातील जलस्रोत मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याने नागरिकांनाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे राज आंब्रे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT