रत्नागिरी : जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यात येत आहे. याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आरोग्य पथक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. कुष्ठरोग शोध मोहीम 2025 जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातझाली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेझ पटेल आदी उपस्थित होते.
डॉ. आठल्ये आणि डॉ. पटेल यांनी संगणकीय सादरीकरण करून मोहिमेबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, या मोहिमेची जनजागृती करा. जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी अर्थात ;शून्य कुष्ठरोग प्रसार; हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग काम करीत आहे. जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करा. या मोहिमेदरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करून स्वतःची तपासणी करून घ्यावी. काही संशयास्पद लक्षणे वाटल्यास जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय याठिकाणी संपर्क करावा. संशयित रुग्णांना चांगला उपचार देऊ शकू, असेही ते म्हणाले. या पंधरवड्यात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक घरोघरी तपासणी करणार आहेत. यासाठी 1 हजार 153 शोध पथके तयार केलेली आहेत. 236 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक पथकात एक आशा व एक पुरुष स्वयंसेवक असणार आहे. जोखीमग्रस्त व दुर्लक्षित भागांत राहणाऱ्या व्यक्तीमध्ये कुष्ठरोग लक्षणांची ओळख व वेळेवर उपचार देणे, प्रसार रोखणे व सामाजिक भेदभाव दूर करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.