खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड-चिपळूणदरम्यान एक्सेल फाटा परिसरात रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास धावत्या कारला अचानक आग लागल्याची थरारक घटना घडली. पहाटे सुमारे पाचच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणारी मारुती एर्टिगा कार महामार्गावरील डिव्हायडरवर आदळली. अपघातानंतर काही क्षणातच कारने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, चालक मुंबई येथून गोव्याच्या दिशेला मोटार (एमएच 43 एएल 3024) घेऊन जात होता. पहाटे झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकावर आदळली. अपघातानंतर कारच्या पुढील भागातून अचानक धूर व आगीचे लोळ उठू लागले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वाहनातील सर्व प्रवासी तत्काळ बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही मिनिटांतच कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असून कारमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच लोटे एमआयडीसी येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने प्रयत्नपूर्वक आग आटोक्यात आणली. आगीमुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.