Driver Dies In Khed Taluka Accident
खेड : तालुक्यातील सुकवली-क्रशर परिसरात बुधवारी (दि.१०) सकाळी झालेल्या भीषण अपघातात डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. रिव्हर्स घेताना चालकाचा अंदाज चुकल्याने खडी वाहतूक करणारा डंपर सुमारे ३० ते ३५ फूट खोल दरीत कोसळल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर क्रमांक एमएच ०८ डब्ल्यू ८४७१ हा खडी वाहतूक करत असताना सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास सुकवली-क्रशर परिसरात रिव्हर्स घेत होता. यावेळी चालकाचा अंदाज चुकल्याने डंपर थेट दरीत कोसळला. अपघात इतका भीषण होता की चालकाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली तैनात असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीजधाम यांच्या २४ तास विनामूल्य अपघात मदत सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी मृत चालकाला उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे हलविले.
या अपघातात नितीन विजय पवार (वय २७, रा. चिंचघर-दस्तुरी) यांचा मृत्यू झाला. तरुण चालकाच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
रिव्हर्स घेताना झालेल्या एका क्षणिक चुकीमुळे एका तरुणाचा जीव गेल्याने वाहनचालकांनी विशेषतः अवघड आणि धोकादायक ठिकाणी वाहन चालविताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.