अनुज जोशी
खेड : खेड शहरातील मध्यवर्ती आणि दाट लोकवस्तीचा प्रभाग क्रमांक 2 आज मूलभूत सुविधांच्या अभावाने त्रस्त झाला आहे. डाकबंगला परिसर, शिवाजीनगर, जड्याळवाडी आणि शिगवणवाडी या भागांचा समावेश असलेल्या या प्रभागाची लोकसंख्या 1703 असून, यामध्ये अनुसूचित जातींची 10 व अनुसूचित जमातींची 20 लोकसंख्या आहे.
या प्रभागात असलेले प्रबोधनकार ठाकरे उद्यान लाखो रुपये खर्चून उभारण्यात आले असले तरी आज ते दुरवस्थेला आले आहे. गवत वाढलेले, झोपाळे तुटलेले आणि उद्यानातील प्रकाशयोजना निकामी झाल्याने नागरिकांनी उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि पाणीपुरवठ्याची अनियमितता नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे व्यापारी संकुल परिसरात शासकीय भूखंडांवर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच, पण परिसराचे सौंदर्यही विद्रूप झाले आहे.
दरम्यान, नव्याने उभ्या राहिलेल्या निवासी संकुलांमध्ये सांडपाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यात तर या भागातील अनेक रस्त्यांवर सांडपाण्याचे डबके साचतात. नागरिकांचा प्रश्न आहे की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या प्रभागाकडेच जर प्रशासनाने पाठ फिरवली असेल, तर इतर भागांचे काय? स्थानिक रहिवाशांनी नगरपरिषदेकडे तातडीने दुरुस्ती व स्वच्छतेच्या कामांची मागणी केली असून बोलक्या घोषणांऐवजी प्रत्यक्ष कृती करा, असा इशाराही दिला आहे.