Lote Parshuram MIDC chemical factory explosion
खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील थर्स ऑरगॅनिक या रासायनिक कारखान्यात नवीन उत्पादनाची प्रक्रिया सुरू असताना रसायनाच्या ड्रममध्ये अचानक स्फोट झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत एका कामगाराला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात पहिली पाळी आणि सर्वसाधारण पाळीतील कामगार, तसेच कंपनीचे कर्मचारी व अधिकारी असे एकूण २८ जण उपस्थित होते. नवीन उत्पादनाची प्रायोगिक चाचणी सुरू असताना एका ड्रममध्ये रसायनाचे मिश्रण करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान तापमान अचानक वाढल्याने रसायनाने पेट घेतला आणि ड्रममध्ये हलकासा स्फोट झाला.
स्फोटाचा आवाज जवळच असलेल्या अग्निशमन दलापर्यंत पोहोचताच अग्निशमन अधिकारी नलावडे हे जवानांसह तातडीने घटनास्थळी आगीच्या बंबासह दाखल झाले. मात्र त्यापूर्वीच कारखाना व्यवस्थापनाने तात्काळ उपाययोजना करत रसायनाची आग आटोक्यात आणत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
घटनेनंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी झालेल्या धावपळीत एका कामगाराचा पाय मुरगळल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. जखमी कामगाराला तात्काळ उपचारासाठी जवळील दवाखान्यात हलवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसून परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली.