Ratnagiri News | घरगुती गॅस पुरवठा 25 दिवसांत झालाच पाहिजे

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची रत्नागिरीतील गॅस एजन्सीला भेट
जिल्हाधिकारी मनुज जिंदल
जिल्हाधिकारी मनुज जिंदल
Published on
Updated on

रत्नागिरी : मागणीनंतर 45 दिवसांत घरगुती गॅसचा पुरवठा होणार हे वृत्त चुकीचे आहे. 25 दिवसांत घरगुती गॅसचा पुरवठा झालाच पाहिजे. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा आहे. बुकिंगसाठी ग्राहकांनी व्हॉटस्‌‍ॲपचा वापर करावा. ग्राहकांनी अजिबात घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी आणि ग्राहकांशी थेट संवाद साधला.जिल्हाधिकारी जिंदल यांनी यावेळी गॅस एजन्सीच्या व्यवस्थापनाला बुकिंगसंदर्भात माहिती देणारा फलक दर्शनी भागात लावण्याबाबत सूचना दिली. त्याचबरोबर ग्राहकांचे येणारे फोन घेऊन त्यांना समाधानकारक उत्तरे द्यावीत. त्यांच्या शंकांचे निरसन करावे. त्याचबरोबर बुकिंगची यादी कमी करण्याबाबत नियोजन करावे. ग्राहकांना 25 दिवसांत गॅस सिलिंडर मिळाले पाहिजे, अशी सूचनाही दिली.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन पाहणी व पडताळणी केली. ग्राहकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस पुरवठ्याबाबत अफवा पसरत आहेत. त्यामुळे नागरिक घाबरून जात आहेत. त्यासाठी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलो होतो. आपल्या जिल्ह्यात शासन आपल्याला चांगल्या प्रकारे गॅस पुरवठा करत आहे. घरगुती गॅस पुरवठ्याबाबत 45 दिवसांची बातमी समाज माध्यमांवर पसरत आहे. ती चुकीची बातमी आहे. शासनाचे निर्देश आहेत की, प्रत्येक ग्राहकापर्यंत 25 दिवसांमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा झाला पाहिजे. त्यानुसार आम्ही सर्व गॅस एजन्सींना 25 दिवसांत गॅस पुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

45 दिवसाबाबत एजन्सीमध्ये येत असलेली तांत्रिक अडचण आजच निकाली निघेल. त्यामुळे ग्राहकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. ग्राहकांनी आपल्या समस्यांसाठी 7057222233 या जिल्हा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचबरोबर सिलेंडर बुकींगसाठी गॅस एजन्सीजच्या व्हॉट्स ॲप क्रमांकांचा वापर करावा. त्याबाबतची माहिती ग्राहकांच्या गॅस बुकमध्ये दिली आहे. शिवाय याबाबतची माहिती ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वच गॅस एजन्सींनी दर्शनी भागात फलक लावावेत, अशी सूचनाही दिल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news