पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Bomb Explosion | खेड तालुक्यात गावठी बॉम्बच्या स्फोटात १२ वर्षीय मुलगा जखमी

खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथील घटना; शिकारीसाठी बॉम्ब ठेवल्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

Khed Taluka Country Made Bomb Blast Child Injured

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बच्या स्फोटात १२ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिकारीसाठी जंगल परिसरात गावठी बॉम्ब ठेवण्यात आल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव सुरेश येसरे (वय १२) हा मुलगा स्फोटात जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात व तेथून पुढे अधिक उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले आहे. सायंकाळच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच श्वान पथकाच्या सहाय्यानेही परिसरात तपासणी करण्यात येत आहे.

पोलिस अधिकाऱ्यांकडून गावातील नागरिकांची चौकशी सुरू केली आहे. हा गावठी बॉम्ब नेमका कुणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला होता. याचा सखोल तपास करण्यात येत आहे. शिकारीसाठी स्फोटकांचा वापर करण्यात आला असावा, अशी प्राथमिक शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुरडे गोठलवाडी येथे झालेल्या या गावठी बॉम्ब स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT