Industry Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Industrial Development -रत्नागिरी राज्याच्या औद्योगिक नकाशावर झळकणार

Ratnagiri Industrial Development -रत्नागिरी राज्याच्या औद्योगिक नकाशावर झळकणार

पुढारी वृत्तसेवा

उद्योगमंत्री सामंत यांच्या पुढाकारातून ७,५०० कोटींच्या ग्रीन स्टील प्रकल्पासह नव्या औद्योगिक युगाची चाहूल

रोजगार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

रत्नागिरी : जान्हवी पाटील

आंबा, काजू, मत्स्य व्यवसाय आणि पर्यटनासाठी असलेली रत्नागिरीची ओळख आता औद्योगिक क्षेत्रातही निर्माण होण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडू लागली आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात ग्रीन स्टील, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळत असून यामुळे रत्नागिरी राज्याच्या औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकण्याची चिन्हे दिसत आहेत.

जिल्ह्यासाठी प्रस्तावित सुमारे ७,५०० कोटी रुपयांच्या ग्रीन स्टील प्रकल्पाला या परिवर्तनाचा केंद्रबिंदू मानले जात आहे. राजापूर आणि रत्नागिरी येथे या प्रकल्पाची दोन युनिटस् उभारण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योगवाढीसह स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

उद्योगवाढीसोबतच पर्यावरण संवर्धनालाही समान प्राधान्य देण्याची भूमिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सातत्याने मांडली आहे. स्थानिकांचा विरोध असलेले किंवा पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प जिल्ह्यात आणले जाणार नाहीत, तर प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक उद्योगांना प्राधान्य दिले जाईल, अशी त्यांची स्पष्ट भूमिका असल्याचे सांगितले जाते.

मोठ्या उद्योगांसह सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ होणाऱ्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा प्रकल्पांनाही प्राधान्य दिले जात आहे. ग्रीन स्टील प्रकल्पाबरोबरच सीएनजीसारख्या सुविधांमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ग्रीन स्टील प्रकल्पामुळे विशेषतः राजापूर परिसराच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.

कोकणातील तरुणांसाठी रोजगाराची नवी संधी

कोकणातील मोठा युवक वर्ग रोजगारासाठी मुंबई आणि इतर शहरांकडे स्थलांतरित होतो. प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पांमुळे स्थानिक स्तरावरच रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे कोकणातील कुशल मनुष्यबळाला आपल्या जिल्ह्यातच करिअर घडवण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

औद्योगिक नकाशावर रत्नागिरीची ठळक नोंद

ग्रीन स्टील, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे रत्नागिरीची ओळख पारंपरिक कृषी आणि पर्यटनापुरती मर्यादित न राहता आधुनिक औद्योगिक जिल्हा म्हणून निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रत्नागिरी भेटीमुळे या प्रकल्पांच्या हालचालींना वेग मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT