रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरी जिल्ह्यातील यांत्रिकी मच्छीमार नौका साडेबारा नॉटिकल मैल बाहेरील समुद्रात जाऊन मासेमारी करत आहेत. त्याचबरोबर परप्रांतीय अत्याधुनिक मलपी मच्छीमार नौका साडेबारा नॉटिकल मैल च्या आत येवून मासेमारी करत आहेत. रत्नागिरीच्या समुद्रात एका-एका ठिकाणी ५० ते ६० नौका मासेमारी करताना दिसतात.
समुद्रातील वाऱ्यामुळे स्थानिक नौकांना मासेमारी न करताच बंदरात परतावे लागत आहे. अशा वेळी परप्रांतीय नौका आमच्या हक्काची मासळी पकडून नेली जात असल्याचा आरोप मच्छीमार नेते बिलाल सोलकर यांनी केला. यातून सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाची गस्ती नौका ही अत्याधुनिक असली पाहीजे हेच सुचीत होत आहे.
सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाची गस्ती नौका लाकडी असून त्या गस्ती नौकेचा वेग २०० अश्वशक्तीपेक्षा अधिक नाही. त्याचवेळी अधुनिक मलपी नौकांचे इंजिन ५०० अश्वशक्ती वेगाचे इंजिन असते. त्यामुळे गस्ती नौका आणि मलपी नौकांच्या वेगाची तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे गस्ती नौकांच्या मदतीने समुद्रातील मलपी नौकांना पकडून त्यांच्यावर कारवाई होणे फारच अशक्य असते. अशा वेळी मत्स्य व्यवसाय विभागाच्या ताफयात गस्तीसाठी अशाच आधुनिक आणि पोलादी बांधणीची नौका आवश्यक आहेत.
सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाचे गस्ती पथक नवदुर्गा नावाच्या लाकडी नौकेतून गस्त घालत आहेत. जुनी रामभद्रा गस्ती नौका सुद्धा फायबरचीच आहे. ही गस्ती नौका दुरुस्तीला गेली असल्याने नवदुर्गा या लाकडी नौकेतून गस्त घालावी लागत आहे. त्यामुळे घुसखोरी करुन मासेमारी करणाऱ्या मलपी नौकांचे फावले आहे. गेल्या दहा दिवसांपासून समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौका आज रविवारपर्यंत समुद्रातील धोकादायक परिस्थितीमुळे मासेमारी न करताच बंदरात परतत आहेत.
यांत्रिकी नौकांना साडेबारा नॉटिकल मैल बाहेर जावून मासेमारी करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे अनेक नौका गेल्या दहा दिवसांपासून बंदरातच उभ्या आहेत. ज्या नौका मासेमारीसाठी जात आहेत त्यांना खर्चाइतकीही मासळी मिळत नाही. परंतू त्याचवेळी आमच्या समोरुन येथील समुद्रातील मासळी मलपी नौका पकडून नेत असल्याचे दुःख आहे, असेही मच्छीमार नेते बिलाल सोलकर यांनी सांगितले.