रत्नागिरी : जून महिना संपला असून जुलै महिन्याच्या प्रारंभीच पावसाचा जोर वाढला आहे. दिवस-रात्र कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, धरणांतील पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. शहरातील शीळ धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील पाण्याची चिंता मिटली आहे.
जिल्ह्यात केवळ ३ तालुक्यांत ५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ५ जुलैपर्यंत जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असून, मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस पाऊस झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने झोडपून काढले. त्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभीच पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. रात्रंदिवस कधी संततधार, तर कधी मुसळधार पावसाची बरसात होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत, शाळांची पडझड, घरांची भिंत कोसळली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
एकंदरीत, जुलै महिना कोकणाला लकी ठरला आहे. त्यामुळे जून महिन्याचा बॅकलॉक जुलै महिन्यात भरून काढणार असल्याचे सांगण्यात आले. पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांना समुद्रात जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.
मुचकुंदी नदी वगळता नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यांतील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. नद्यांची सध्याची पाणी पातळी- जगबुडी ४.६०, वशिष्ठी १.६५, शास्त्री ३.६०, सोनवी ३.२०, काजळी १३.५०, कोदवली १.८०, मुचकुंदी ०.३५, बावनदी ५.५२. लांजा भांबेड पूल येथील मुचकुंदी नदी वगळल्यास सर्वच नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.
भात लावणीस प्रारंभ
जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्या शेतकऱ्यांकडून पावसामध्ये भात लावणीस प्रारंभ केले आहे. तर काहींची पेरणी पूर्ण झाली आहे, तर काहींची बाकी असल्याचे सांगण्यात आले.
या जिल्ह्यांना रेड, ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी जिल्ह्याला ६ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगडला ३ व ४ जुलै रोजी रेड अलर्ट, पुणे ३,४,५ रोजी रेड अलर्ट, ठाण्याला ४ जुलै रोजी रेड अलर्ट, सिंधुदुर्ग ४ जुलैला ऑरेंज अलर्ट तर उर्वरित यलो अलर्ट जारी केले आहे. धुळे, नळदुर्ग, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, जालना यलो अलर्ट जारी केला आहे.