राजापूर : पुढारी वृत्तसेवा : हर्डी येथे पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी होळी खेळवता खेळवता पारंपरिक पध्दतीने खेळल्या जाणारा लाठीकाठीचा खेळ तालुकावासियांना आकर्षणाचा ठरला आहे. हा खेळ पाहण्यासाठी लगतच्या गावांतील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. (Ratnagiri Holi 2025)
हर्डी येथे पारंपरिक पध्दतीने फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. या वेळी पोफळीच्या डांबाची होळी करून ढोल-ताशाच्या गजरात नाचविली जाते. या वेळी होळीवर चढून लाठीकाठीचा खेळ खेळला जातो. हे एक वेगळे वैशिष्ट्य येथील होळी उत्सवाचे पाहायला मिळते. होळीसाठी पोफळीच्या डांबाची निवड केली जाते. त्याला सजविले जाते व देवाच्या नावाचा जयघोष करीत फाका देत होळी खेळविली जाते.
होळीच्या डांबावर दोन अथवा चार खेळाडू चढून बनाटीचा खेळ खेळतात. ग्रामस्थ होळी नाचवतानाच हा खेळ सुरु असतो. त्यामुळे हे दृश्य फारच मनोहरी असते. हा खेळ पाहण्यासाठी अबालवृध्द, महिला-पुरुष मोठी गर्दी करतात.