

कडवई: पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे होळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या होळी उत्सवाच्या निमित्ताने मोठया प्रमाणावर चाकरमानी गावी दाखल झाले आहेत. सगळीकडे एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ratnagiri Holi 2025)
कडवई गावच्या शिमगोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे काठीच्या सहाय्याने उभा केलेला माड. सर्व प्रथम गावातील गावकर होळीच्या आधी गावात फिरून माड शोधून ठेवतात. होळीच्या दिवशी सर्व मानकरी, ग्रामस्थ माड तोडण्यासाठी एकत्र येतात. तोडलेला माड ढोलाच्या तालावर नाचवत - नाचवत देवळाजवळ आणला जातो. रात्रीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी माडाला सामोरी जाते. तिथून पालखी देवळाच्या प्रांगणात आणून नाचवायला सुरुवात करतात. ढोल आणि सनईच्या सुरात लयबद्ध पडणारी पावले उपस्थितांना मंत्रमुग्ध करत होती.
मंदिराच्या रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची दुकाने सजली. त्यामध्ये मिठाई, कलिंगड, सरबत, खाद्यपदार्थ, इमिटेशन ज्वेलरी आणि खेळणी यांचे खास आकर्षण होती. बच्चे कंपनीसाठी मजेदार खेळ होते. या उत्सवाच्या निमित्ताने हजारो चाकरमनी व पाहुणे गावात दाखल होतात. सगळीकडे एक प्रकारचे चैतन्य भरलेले दिसून येत होते. अनेक दिवसांनी मित्र - मैत्रिणींच्या गाठीभेटी झाल्या. पहाटे काठीच्या सहाय्याने माड उभा केला गेला. होळी पेटवली गेली आणि वर्षभराची ऊर्जा घेऊन सर्वांची पाऊले पुन्हा घराकडे वळली.