गणपतीपुळे : गणपतीपुळेतील केदारवाडी परिसरात एका घरात मोठी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹२ लाख ३६ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना जयगड सागरी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच करत दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
२६ ऑगस्ट रोजी विरेंद्र शांताराम गोसावी हे कुटुंबासह गणेशोत्सवासाठी मूळगावी कडवईला गेले होते. घराची चावी शेजारीणीकडे देऊन त्यांनी कोंबड्यांची देखभाल करण्यास सांगितले होते. २७ ऑगस्ट रोजी दुपारी शेजारीण सरिता पालकर घरात गेल्या असता कपाट उघडलेले आणि सामान अस्ताव्यस्त टाकलेले दिसले. त्यांनी लगेचच गोसावी यांना फोनवर माहिती दिली. गोसावी कुटुंब तातडीने गणपतीपुळे येथे परतले असता घरातील कपाट उचकटून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले.
सहा. पोलीस निरीक्षक यांना या घटनेची माहिती मिळताच कोणताही विलंब न लावता दोन टीम तयार करून स्वतः फिल्डवर उतरून गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या 5 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. रोशन सुरेश जाधव (वय २१, रा. मेढे तर्फे फुणगुस, संगमेश्वर. सध्या रा. गणपतीपुळे), हैदर अजीज पठाण (वय २७, रा. झारणी रोड, रत्नागिरी. सध्या रा. गणपतीपुळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जलद गतीने तपास केल्या बद्दल जयगड गणपतीपुळे परिसरातून जयगड पोलीस टीम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.