रत्नागिरी : गोल्ड ट्रेडिंग करून कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून फिर्यादीची तब्बल 11 लाख 60 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 4 जुलै 2025 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी मारिय (ढठअऊछॠइएऊ) कंपनीची प्रतिनिधी मारिया (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) आणि या कंपनीच्या सर्व खातेदारांवर रत्नागिरी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीची संशयित महिला मारिया हिच्याशी फेसबुक या सोशल मीडियावर ओळख झाली होती. तिने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आपण ट्रेडिंगसंदर्भातील सल्लागार असल्याचे भासवले. त्यानंतर गोल्ड ट्रेडिंग करून कमी वेळेत जास्त नफ्याचे आमिष दाखवून तिने फिर्यादीला व्हॉटसअॅपव्दारे लिंक पाठवून (ढठअऊछॠइएऊ) हे अॅप्लिकेशन मोबाईलमध्ये इंस्टॉल करण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादीची दिशाभूल करुन पैसे गुंतवण्यास भाग पाडले. तसेच गुंतवणूकीचा लाभ न देता मुळ गुंतवणुकीच्या रकमेची फिर्यादीने विचारणा केल्यावर कंपनीच्या नियमाप्रमाणे 6 लाख 13 हजार 647 रुपये इतकी रक्कम तुम्हाला भरावी लागेल आणि मनी लॉड्रिंग झाल्यामुळे अकाउंट ‘सस्पेक्टेड’ झाले असल्यामुळे सर्व रक्कम भरावी लागेल, अशी उत्तरे दिली. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने पैसे भरुनही त्यांना गुंतवणूक केलेल्या रकमेवर कोणताही लाभांश न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने दि. 4 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतील सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4),319(2) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी), प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.