

रत्नागिरी : घरातून विविध कारणांमुळे बेपत्ता होणार्या व्यक्तींंचा शोध घेण्याचे आव्हान रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी यशस्वीपणे पेलल्याचे रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता व्यक्तींच्या शोधकार्यात रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात सरस कामगिरी नोंदवली. जुलै 2022 ते 2025 या कालावधीतील आकडेवारी पाहता विशेषत: महिला, अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेण्यात पोलिस दलाला मोठे यश मिळाले आहे.
बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांची होणारी घालमेल शब्दांत मांडणे कठीण आहे. प्रत्येक दिवस शोधात आणि प्रतीक्षेत जातो. याच वेदना आणि आशेच्या धाग्याला पकडून रत्नागिरी पोलिस दलाने काम केले. जुलै 2022 ते 2025 या काळात अनेक महिला, पुरुष आणि अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली होती. पोलिस दलाने केवळ तक्रार दाखल न करता या प्रत्येक प्रकरणाला मानवी दृष्टिकोनातून पाहिले. बेपत्ता व्यक्तींना शोधून काढणे हे केवळ ‘ड्युटी’ नसून, तुटलेल्या कुटुंबांना जोडणे आहे, ही भावना पोलिसांनी जपली.
बेपत्ता व्यक्तींचा जलद आणि प्रभावी शोध घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी ‘बेपत्ता नोंद कक्ष’ स्थापन केला आहे. हा कक्ष उपविभागीय स्तरावर विशेष सेल, जिल्हा स्तरावर इन्चार्ज (पीआय) आणि आवश्यक कर्मचारी (पीएसआय व पाच कर्मचारी) यांच्या माध्यमातून अविरत काम करत आहे. या कक्षाच्या प्रभावी तपासकार्यामुळेच हे महत्त्वपूर्ण यश प्राप्त झालं आहे.
अल्पवयीन मुला-मुलींच्या (18 वर्षांखालील) शोधकार्यात पोलिसांनी जवळपास 100% (99.27%) यश मिळवले आहे. केवळ दोन प्रकरणांचा शोध अद्याप सुरू आहे. बेपत्ता झालेल्या 998 महिलांपैकी 936 महिलांना शोधून काढण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. एकूण बेपत्ता व्यक्तींच्या शोधकार्यात 90 टक्क्यांहून अधिक यश मिळवून रत्नागिरी पोलिसांनी संपूर्ण राज्यासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.