रत्नागिरीत सध्या गाजत असलेल्या भक्ती मयेकर खून प्रकरणानंतर संशयित आरोपीने आणखी दोन खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली असून, मागील दीड वर्षापासून दबलेल्या या प्रकरणांवर आता प्रकाश पडला आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी या तीन खून प्रकरणांत प्रमुख आरोपी दुर्वास पाटील याच्यासह आणखी तीनजणांना अटक केली आहे. थंड डोक्याने त्याने तीन खून केले व दोघांचे मृतदेह आंबा घाटातून दरीत फेकून दिले. ज्या खोलीत भक्तीला मारण्यात आले, त्याच खोलीत दंड थोपटत डान्स करीत त्याने क्रूरतेचा कळस गाठला...
राजेश चव्हाण, रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील पंचक्रोशीचे ठिकाण असलेल्या वाटद - खंडाळा येथे दुर्वास पाटील या तरुणाचा सायली बार आहे. जयगड परिसरात असणार्या उद्योगांमुळे या पंचक्रोशीच्या ठिकाणी कामगारांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे दुर्वासचा बारही चांगला चालत होता. यातून त्याची आर्थिक कमाईही मोठी होती. त्यामुळे पैशाची उधळपट्टीही तो करीत होता. दोन वर्षांपूर्वी फेसबुक फ्रेंडस्च्या माध्यमातून रत्नागिरीतील भक्ती मयेकर या तरुणीची दुर्वास पाटील याच्याशी ओळख झाली होती. यातून मेसेज, कॉल यांच्या देवाणघेवाणीतून त्यांच्यातील मैत्री घट्ट झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढीला लागले होते. त्यामुळे भक्ती ही अनेक वेळा दुर्वासला भेटायला खंडाळा येथे जात-येत असे.
प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर दुर्वासने रत्नागिरीतीलच आणखी एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर भक्तीचे आणि त्याचे खटके उडू लागले होते. याच दरम्यान भक्ती ही गरोदर राहिल्यानंतर तिने दुर्वासच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र दुर्वास भक्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत होता.
याच दरम्यान दुर्वासने प्रेमात पाडलेल्या दुसर्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही घरातून बघण्याचा कार्यक्रम झाला होता. ही गोष्ट भक्तीला समजल्यानंतर तिने दुर्वासचा लग्नासाठी पीछा पुरवला होता. त्यामुळे 16 ऑगस्ट रोजी दुर्वासने तिला खंडाळा येथे बोलावून घेतले. सायंकाळी उशिरा ती दुर्वासच्या सायली बारमध्ये आली. त्यानंतर दुर्वासने बारच्या वर असणार्या खोलीत नेऊन तिचा गळा आवळून तिला ठार मारले. यावेळी दुर्वासने भक्ती गरोदर असल्याचेही पाहिले नाही. यानंतर त्याने व्हिडीओ कॉल करून दंड थोपटत डान्सही केला. याची माहितीही पोलिसांनी गोळा केली आहे. खून केल्यानंतर दुर्वासने आपले बारमधील सहकारी विश्वास विजय पवार व सुशांत शांताराम नरळकर यांना सोबत घेत मृतदेह आंबा घाटातील गायमुखसमोरील दरीत फेकून दिला.
घटनेनंतर आठ दिवस उलटूनही भक्तीचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. भक्तीच्या घरीतील व्यक्तींनीही पोलिस स्टेशनला तक्रार देत दुर्वासवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी दुर्वासला बोलावून चौकशी केली होती. परंतु त्याने आपले ब्रेकअप झाले असून कोणताच संबंध राहिला नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला त्याला सोडून दिले. भक्तीच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे पोलिसांनी पुन्हा दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले. खंडाळ्यामध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले. यावेळी सायली बारमधील फुटेजमध्ये असंगतीही आढळून आली. परंतु शेजार्यांच्या फुटेजमध्ये भक्ती दिसून आली होती. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा दुर्वासला चौकशीसाठी बोलावले. यावेळी दुर्वाससमोर सर्व रेकॉर्ड ठेवल्यामुळे खरे बोलण्याशिवाय पर्याय उरला नाही.
या घटनेनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत दुर्वाससह त्याच्या दोन्ही सहकार्यांना जेरबंद केले. याच दरम्यान चौकशीमध्ये दुर्वासने आणखी खून केल्याची माहिती पुढे आली. सायली बारमध्ये काम करणार्या दोन वेटरचे जीवनही त्याने संपवले होते. दीड वर्षापूर्वी किरकोळ कारणावरून सीताराम वीर याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा साक्षीदार दुसरा वेटर राकेश जंगम हा होता. मारहाणीच्या घटनेनंतर पाच-सहा दिवसांनी वीर याचा मृत्यू झाला होता. परंतु त्याच्या नातेवाईकांनी तक्रार न दिल्याने दुर्वासविरोधात कारवाई झाली नव्हती. या घटनेचा साक्षीदार असणारा दुसरा वेटर राकेश जंगम याने त्यावेळी पोलिसांनी विचारल्यास आपण खरी माहिती सांगणार असे सांगितले होते.
त्या घटनेनंतर राकेश जंगम बारमधील कामही सोडून गेला होता. भविष्यात राकेशकडून धोका होऊ शकतो हे ओळखत दुर्वासने त्याला कोल्हापूरला फिरायला चल म्हणून सांगत 6 जून 2024 मध्ये गाडीत बसवले. यावेळी दुर्वाससोबत बारमधील कामगार विश्वास विजय पवार आणि इस्लामपूर (ता. वाळवा) येथील मित्र निलेश भिंगार्डे सोबत होते. गाडी आंबा घाटातून जात असताना राकेश जंगम याचा गळा आवळण्यात आला. राकेशचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मृतदेह आंबा घाटातील गायमुखजवळील खोल दरीत टाकण्यात आला.
त्यानंतर वर्षभर काहीच झाले नाही व आपल्याला दोघांविषयी काहीच माहिती नाही या आविर्भावात तो वावरत होता. परंतु वर्षभरानंतर भक्तीच्या मृत्यूमुळे दोन्ही खुनांना वाचा फुटली. यातील भक्ती मयेकर हिचा मृतदेह ट्रेकरच्या मदतीने पोलिसांनी दरीमधून बाहेर काढून तिची ओळख पटवली. राकेश जंगम याचा मृतदेह अद्याप सापडलेला नसून तो शोधण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.
या हत्याकांडात क्रूरकर्मा दुर्वास पाटील याच्यासह आतापर्यंत विश्वास पवार, सुशांत नरळकर, निलेश भिंगार्डे यांना अटक केली आहे. चारजण खुनाच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहेत. चारहीजणांना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी तांत्रिक गोष्टींचे पुरावे बळकट करण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्न करीत आहे.
रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, जयगड पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
क्रूरकर्मा दुर्वासचे कारनामे उघड झाल्यानंतर जयगड व खंडाळा पंचक्रोशीतील बेपत्ता असलेल्या व्यक्तींची यादीच पोलिस अधीक्षकांनी मागवली आहे. या बेपत्ता व्यक्तींचा दुर्वासशी काही संबंध आहे का याचीही चौकशी केली जाणार आहे.