AI generated Image 
रत्नागिरी

Digital arrest scam ratnagiri : डिजिटल अरेस्टचा धाक दाखवून सेवानिवृत्त महिलेला ८७.४५ लाखांचा गंडा; रत्नागिरीत खळबळ

सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : डिजिटल अरेस्ट आणि मनी लाँड्रिंगच्या कारवाईची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका ६५ वर्षीय सेवानिवृत्त महिलेला तब्बल ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

रत्नागिरीतील तेलीआळी येथील शिवनेरी घरामध्ये राहणाऱ्या मधूश्री विलास पुनसकर या सेवानिवृत्त महिला आहेत. दि. १३ ऑगस्ट २०२६ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत त्यांना काही सायबर भामट्यांचे फोन आले होते. फोन करणाऱ्या भामट्यांनी स्वतःची ओळख नीरज कुमार आणि प्रदीप जयसवाल अशी करून दिली. तसेच आपण मिनिस्ट्री ऑफ इंडिया मधून बोलत असल्याचे भासविले.

भामट्यांनी मधूश्री पुनसकर यांच्या नावावरील आधारकार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाविरोधात देशविरोधी कारवायांच्या अनेक तक्रारी दाखल असल्याचे सांगितले. या गंभीर प्रकरणात पोलिसांकडून तात्काळ अटकेची कारवाई होऊ शकते, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण करण्यात आली.

या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी मधूश्री पुनसकर व त्यांच्या पतीच्या नावावरील सर्व ठेवी मनी लाँड्रिंगमधून घेतल्या आहेत का, याची पडताळणी करावी लागेल, असे भामट्यांनी सांगितले. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सर्व रक्कम परत केली जाईल, असा विश्वास देत त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपये उकळले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मधूश्री पुनसकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांक वापरणाऱ्या भामट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक पाटील करत आहेत. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अज्ञात व्यक्तींचे फोन, डिजिटल अरेस्टच्या धमक्या किंवा आर्थिक पडताळणीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या कॉल्सना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT