प्रवीण शिंदे
दापोली : दापोलीत नुकतीच दोन-तीन दिवस किमान तापमानात मोठी घट नोंदली गेली आहे. मंगळवारी पारा चक्क 8.5 अंश सेल्सिअस इतका खाली गेला. हवेतील गारवा आणि अंगाला झोंबणारी थंडी नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी दिलासा देणारी ठरत आहे.
दिवाळीनंतर सुरू झालेला पर्यटन हंगाम काही दिवस अवकाळी पावसामुळे थांबला होता; मात्र आता वाढत्या थंडीमुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. शनिवार-रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांचा दापोलीत मोठा ओघ असतो, तर मधल्या आठवड्याच्या दिवसात काही प्रमाणात पर्यटक दापोलीला भेट देत असतात.
दापोलीत भेटीवर येणारा पर्यटक प्रथम किनारा गाठतो. किनाऱ्यावरील खारी हवा आणि थंडीची झुळूक अनुभवण्यासाठी ते तासन्तास वाळूत बसून पर्यटनाचा आनंद घेतात. वादळी वाऱ्यामुळे थांबलेला स्थानिक मासळी व्यवसायही पुन्हा सुरू झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि कोल्हापूरसह इतर शहरांमधून येणाऱ्या पर्यटकांना चवदार मासळीचा आस्वाद घेता येतो. स्थानिक व्यावसायिकांचा असा विश्वास आहे की, वातावरणात गारवा कायम राहिला, तर पर्यटन क्षेत्रात लक्षणीय वाढ होईल. दापोलीचे पर्यटन जागतिक स्तरावर ओळखले जाते आणि लवकरच जागतिक नामांकन मिळेल , अशी आशा व्यक्त केली जाते. त्यामुळे थंडी आणि नैसर्गिक वातावरणाच्या संगमामुळे दापोली पर्यटन हंगामात नवीन उमेदीची लाट निर्माण झाली आहे.