Minor Assault Case Pudhari
रत्नागिरी

Minor assault case ratnagiri : राजापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २८ वर्षीय तरुणाला अटक

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत २८ वर्षीय संशयिताला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश काशीराम गुरव (वय २८, रा. तळवडे, ता. राजापूर) याने पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडितेने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली.

या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, रायपाटण पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम बाणे, पोलिस कॉन्स्टेबल निलेश कात्रे, स्वप्नील घाडगे आणि रामदास पाटील यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५(२), ७६ तसेच पॉक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस सहाय्यक निरीक्षक दीपज्योती पाटील करीत असून, घटनेशी संबंधित सर्व पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, यासाठी तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT