रत्नागिरी ः तालुक्यातील वरवडे येथे प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बाळाचा खून केल्याच्या गंभीर आरोपाखालील मातेची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. वरवडे भंडारवाडी येथील 45 वर्षीय महिलेला या प्रकरणात निर्दोष ठरविण्यात आले आहे. या प्रकरणी जयगड पोलिसांनी 22 डिसेंबर 2019 रोजी गुन्हा दाखल करून तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
प्रकरणातील माहितीनुसार, 22 डिसेंबर 2019 रोजी वरवडे येथील खाडीच्या खाजणात स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिस तपासात हे अर्भक या महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले होते. ही विवाहित असून अनेक वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत होती. दरम्यान, गावातील एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच ती गर्भवती राहिली होती, असे तपासात पुढे आले होते. विवाहबाह्य संबंध उघडकीस येतील या भीतीपोटी तिने पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून नवजात बाळाचा खून केला आणि नंतर खाडीच्या खाजणात मृतदेह फेकून दिला, असा आरोप पोलिसांनी केला होता. या पार्श्वभूमीवर जयगड पोलिसांनी तिच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 302, 201, 315 व 318 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या घटनेनंतर संपूर्ण जयगड दशक्रोशीसह तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गेल्या सुमारे पाच वर्षांपासून सदर महिला कारागृहात होती. एप्रिल 2025 मध्ये तिला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता. अखेर सत्र न्यायालयात झालेल्या सविस्तर सुनावणीनंतर आणि पुराव्यांच्या अभावात न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली.