रत्नगिरी ः रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ परिसरातील वीजपुरवठा सोमवारी देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे या दिवशी धरणावरील लहान-मोठ्या बिघाडांची दुरुस्ती करून घेण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी शहरवासीयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषदेने केले आहे.
महावितरणकडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शिळ धरण परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे रत्नागिरी नगर परिषदेला कळवण्यात आले आहे. वीजपुरवठा नसल्याने धरणातील जॅकवेलमधून पाण्याचे पंपिंग करता येत नाही. त्यामुळे पाणी साठवण टाक्या आवश्यक पातळीपर्यंत भरत नाहीत. अशा वेळी अपेक्षित दाबाने पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवून त्या दिवशी आवश्यक असलेली देखभाल दुरुस्तीची कामे करून घेतली जाणार आहे.
धरणावरील जॅकवेलमधून पाणी खेचणाऱ्या पंपांमध्ये साचलेला गाळ, कचरा काढून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर छोटी कामेसुद्धा करून घेतली जाणार आहेत. त्यामुळे सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांनी सहकार्य करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन रत्नागिरी नगर परिषदेने केले आहे.