

रत्नागिरी : कोणत्याही नागरिकाने आपत्कालीन परिस्थितीत, मदतीसाठी किंवा समस्या निवारण्यासाठी डायल 112 या प्रणालीवर कॉल करावा. कॉलरला प्रत्यक्षात योग्य व आवश्यक मदत मिळाली आहे की नाही, त्यांची समस्या पूर्णपणे सूटली आहे की नाही, याबाबत कॉलरच्या मदतीची खात्री व अभिप्रायासाठी ‘मिशन परिपूर्ती’ हा उपक्रम रत्नागिरी पोलिस दलातर्फे 29 ऑगस्ट 2025 पासून राबवण्यात येत आहे.
या उपक्रमाचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच सर्व कॉल करणाऱ्या व्यक्तींचा अभिप्राय घेण्यासाठी ‘मिशन परिपूर्ती’ अंतर्गत एक विशेष सेल तयार करण्यात आलेले आहे. या सेल मार्फत आतापर्यंत 2782 कॉलर्सचा अभिप्राय घेण्यात आला असून त्यांच्या समस्यांचे 100 टक्के निराकरण करण्यात आल्याची माहिती पोलिस दलाकडून देण्यात आली. डायल 112 वर कॉल झाल्यानंतर आपल्या समस्येचे निराकरण झाले किंवा नाही? आपल्याला योग्य व आवश्यक पोलिस मदत मिळाली अथवा नाही? यासाठी ‘मिशन परिपूर्ती’ सेलि नियंत्रण कक्ष, रत्नागिरी येथे स्थित या सेलमार्फत सातत्याने डायल 112 च्या कॉलरचा पाठपुरावा केला जातो. डायल 112 वर आलेल्या कॉलरपर्यंत पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी किंवा अंमलदार पोहचल्यानंतर थोड्या वेळाने तक्रारदार कॉलरला मदत अथवा त्यांच्या समस्येचे निराकरण झाले अथवा नाही याबद्दल ‘मिशन परिपूर्ती’ सेलकडून विचारणा केली जाते व त्यांचा अभिप्राय घेतला जातो. व त्याच्या नोंदी एका स्वतंत्र रजिस्टरमध्ये केल्या जातात.
या नोंदीचे दररोज अपर पोलिस अधिक्षक बी. बी. महामुनी व स्वतः पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे नियमित मॉनिटरिंग करतात. काही समस्या असल्यास पुन्हा या ‘मिशन परिपूर्ती’ सेल मार्फत संबंधित कॉलरशी थेट संपर्क साधला जातो व त्यांच्या समस्येचे निराकरण केले जाते, तसेच कॉलरला आवश्यक मदत मिळाली की नाही, समस्या सुटली की नाही, वागणूक योग्य होती का याबाबत अभिप्राय घेतला जातो. रत्नागिरी पोलिस दलातर्फे नागरिकांना असे आवाहन करण्यात येते कि, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्यास ‘मिशन परिपूर्ती’ या सेवेच लाभ घ्यावा तसेच डायल 112 वर कॉल केल्यानंतर ‘मिशन परिपूर्ती’ सेलचे पोलिस अधिकारी, अंमलदार हे आपल्याला निश्चितपणे कॉल करतील व आपल्या समस्या व अडचणी त्यांच्यापर्युंत पोहोचवण्यात याव्या जेणेकरुन रत्नागिरी पोलिस दलाला आपल्या सर्व समस्यांचे निराकारण करता येईल. त्याचप्रमाणे नागरिकांनी आपल्या समस्या व अभिप्राय स्पष्टपणे मांडावेत, जेणेकरून पोलिस सेवेची गुणवत्ता अधिक प्रभावीपणे सुधारता येईल. तसेच ‘मिशन परिपूर्ती’ या उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण अथवा त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट पोलिस प्रशासनास कळवावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.