चिपळूण : शहरातील खेंड बडदेवाडी परिसरात बुधवारी सकाळी एका घरावर दगड कोसळून दुर्घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनेनंतर संबंधित कुटुंबीयांनी माजी नगरसेवक आशिष खातू यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने ही बाब नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या निदर्शनास आणून दिली. माहिती मिळताच नगराध्यक्ष सकपाळ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली व कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी संबंधित कुटुंबीयांनी या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची तातडीची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश डांगे यांच्या घराच्या वरच्या बाजूला डोंगरातून चिपळूण नगर परिषदेची मोठी पाण्याची पाईपलाइन गेलेली आहे. या लाईनमधून वारंवार गळती होत असल्याने माती सैल होऊन दगड कोसळण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली. याची दखल घेत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य करत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही कुटुंबीयांना दिली.