

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील 38 हजार 500हून अधिक अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी दिलासा मिळणार आहे. मार्च 2026 या सहामाही कालावधीसाठी जिल्ह्याला 2 हजार 172 क्विंटल साखर उपलब्ध झाली आहे. पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दरमहा प्रति शिधापत्रिका 1 किलो साखर वितरीत करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.
पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकावर एक किलो साखर दिली जाते. अंत्योदय शिधापत्रिकाधारक या योजनेसाठी पात्र आहेत. या लाभार्थ्यांना दर महिन्याला एक किलो साखर मिळणे अपेक्षित होते. मात्र मागील दीड वर्षापासून शासनाकडून रेशन दुकानदारांना साखर पुरवठा करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे लाभार्थ्यांना दीड वर्षापासून साखर मिळत नव्हती. लाभार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर राज्य शासनाने साखर वितरण करण्यास नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे आता सहा महिनेपर्यंतची साखर पुरवठा विभागास देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना महिन्याला प्रति किलो 1 किलो साखर मिळणार असून, जिल्ह्यातील रेशन दुकानातून साखर वाटपास सुरुवात झाल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
20 रुपये प्रतिकिलो दर
या साखरेचा दर 20 रुपये प्रतिकिलो असा निश्चित करण्यात आला आहे. ही साखर रास्त भावात दुकानामार्फत कार्डधारकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी शासनाकडून उपलब्ध झालेली ही साखर घ्यावी, असे आवाहन पुरवठा विभागातर्फे करण्यात आले.
वितरण प्रक्रिया सुरू
साखरेचा पहिला टप्पा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदामापर्यंत पोहोचला आहे. गोदामातून ही साखर शहरासह 9 तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांपर्यंत पोहोचवण्यात आलेली असून, प्रत्यक्षात साखर वाटप सुरू झाले आहे.