रत्नागिरी

Ratnagiri News: कणेरी येथे पैशाच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; ७ महिन्यांनंतर छडा

अविनाश सुतार

राजापूर, पुढारी वृत्तसेवा: सागाच्या झाडांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या वाटपाच्या वादावरून सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाचा काटा काढल्याची घटना राजापूर तालुक्यातील कणेरी खालची वाडी येथे घडली आहे. सुमारे सात महिन्यापूर्वी घडलेल्या या खूनाच्या घटनेबाबत एक निनावी पत्र व त्यानंतर मुलीने केलेल्या तक्रारीवरून हा खून झाल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी प्रविण गोविंद लाखण (वय ४८, खालची वाडी, रा. कणेरी) याला अटक केली आहे. त्याला राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. Ratnagiri News

प्रविण गोविंद लाखण (रा. कणेरी, खालचीवाडी) याने आपला सख्खा भाऊ दशरथ गोविंद लाखण (वय ४९) यांचा खून केल्याची तक्रार दशरथ यांची मुलगी वेदा विजय कोळेकर (रा. हातिवले) हिने राजापूर पोलिसांत केली आहे. २१ मे २०२३ रोजी हा प्रकार घडला होता.
या खून प्रकरणात प्रारंभी आलेले एक निनावी पत्र व त्यानंतर मुलीला धीर दिल्यानंतर तिच्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी शिताफीने या प्रकरणी कारवाई करत संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्याबद्दल कौतुक होत आहे. Ratnagiri News

यातील मयत दशरथ लाखण, संयशित आरोपी प्रविण लाखण व त्यांची आई असे तिघेजण कणेरी खालचीवाडी गावात एकत्र रहात होते. सामाईक मालकीच्या सागाच्या झाडांची विक्री केल्यानंतर त्यातुन मिळालेले पैसे वाटून घेण्याबाबत या दोघांमध्ये वाद होता. सदरचे पैसे सर्वांनी वाटून घेऊया, असा मयत दशरथ याचा आग्रह होता. यावरून या दोन भावांमध्ये वाद निर्माण झाला होता. याचा राग मनात धरून आरोपी प्रविण याने भाऊ दशरथ याला २१ मे २०२३ रोजी दुपारी ३.३० च्या पूर्वी काठीने मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या तोंडावर, डोक्यावर व डोळयावर गंभीर दुखापत झाली होती. यात दशरथ याचा २४ मे २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता मृत्यू झाला होता. त्यानंतर तातडीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करून पुरावेही नष्ट करण्यात आले होते. असेही वेदा हिने तक्रारीत नमुद केले आहे.

आपल्या वडिलांचा अचानक अशा प्रकारे मृत्यू झाल्याने मुलगी वेदा हिला संशय येत होता. मात्र, अशा प्रकारे काही तक्रार केल्यास तुलाही जीवे मारू, अशी धमकी प्रविण याने आपणाला दिली होती, असे वेदा हिने तक्रारीत नमुद केले आहे. या घटनेनंतर प्रविण हा एकटाच गावातील घरी रहात होता. तर आई ही दुसरा मुलगा संतोष याच्याकडे मुंबईत रहात आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली.

दरम्यान या खूनाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे एक निनावी पत्र देखील आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केडगे व राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ आणि सहकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली व मयत दशरथ यांची मुलगी वेदा हिला धीर देत वस्तुस्थिती कथन करण्यास सांगितले. त्यानंतर वेदा हिने शुक्रवारी या प्रकरणी राजापूर पोलीसांत आपली तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी प्रविण लाखण याच्या विरोधात गुन्हा दाखल करून शुक्रवारी रात्री १० वाजता कणेरी येथील रहाते घरातून अटक केली आहे. त्याला शनिवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT