समुद्रकिनारे गजबजले; पर्यटनस्थळे ‌‘हाऊसफुल्ल‌’ 
रत्नागिरी

Ratnagiri Tourism : समुद्रकिनारे गजबजले; पर्यटनस्थळे ‌‘हाऊसफुल्ल‌’

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाला बहर, दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांची पर्यटकांना विशेष भुरळ

पुढारी वृत्तसेवा

दापोली : नाताळ व नववर्षाच्या सलग सुट्ट्या, थंड व आल्हाददायक हवामान आणि निसर्गसौंदर्याची भुरळ यामुळे दापोली तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. तालुक्यातील प्रमुख समुद्रकिनारे व पर्यटनस्थळे सध्या अक्षरशः ‌‘हाउसफुल्ल‌’ झाली असून पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.

नाताळ व 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आदी शहरांतून मोठ्या संख्येने पर्यटक दापोली तालुक्यात दाखल झाले आहेत. परिणामी तालुक्यातील बहुतांश हॉटेल्स, रिसॉर्टस्‌‍ आणि निवास योजना पूर्णतः भरल्या असून काही ठिकाणी आधीच आरक्षण बंद करण्यात आले आहे. दापोली शहरापासून अवघ्या सात ते दहा किलोमीटर अंतरावर असलेले मुरुड, कर्दे व लाडघर हे समुद्रकिनारे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. स्वच्छ पांढरी वाळू, फेसाळणाऱ्या समुद्रलाटा, संध्याकाळचा मंद वारा आणि आल्हाददायक गुलाबी थंडीमुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी हे सर्व किनारे पर्यटकांनी फुलून गेले होते.

या शिवाय आंजर्ले, दाभोळ, करजगाव, पाळंदे, हर्णे व केळशी या समुद्रकिनाऱ्यांवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दाभोळ ते केळशी असा सुमारे 80 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या दापोली तालुक्याला पर्यटनदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत राज्यातील प्रमुख शहरांसह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांनाही दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांची विशेष भुरळ पडत आहे.

या हंगामात एक लाखांहून अधिक पर्यटकांनी दापोली तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट दिल्याचा अंदाज आहे. यात कड्यावरचा गणपती, केशवराज मंदिर, केळशी येथील याकूब बाबा दर्गा, मुरुडचे दुर्गादेवी मंदिर, दाभोळचे चंडिका देवी मंदिर, उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड, पन्हाळेकाझीची लेणी, हर्णे समुद्रातील सुवर्णदुर्ग व कणकदुर्ग, गोवा किल्ला, वणंद येथील माता रमाबाई आंबेडकर स्मारक, पालगड येथील साने गुरुजी स्मारक, दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठ, बुरोंडीजवळील भव्य श्री परशुराम पुतळा तसेच लाडघरजवळील तामसतीर्थ येथील तांबडा या स्थळांचा समावेश आहे.

दरम्यान, पर्यटनाला चालना मिळत असली तरी अपुऱ्या सुविधा, ऐन हंगामात कमी पडणारी निवासव्यवस्था आणि रस्त्यांची दयनीय अवस्था हे प्रश्न अद्याप कायम आहेत. पर्यटन विकासाच्या घोषणा पुरेशा असून प्रत्यक्षात मूलभूत सुविधा उभारण्याची गरज असल्याची भावना पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः तालुक्यात येणारे सर्व प्रमुख रस्ते चांगल्या स्थितीत असणे आवश्यक असून रस्ते कामांतील दिरंगाई व गैरप्रकारांवर लोकप्रतिनिधींनी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT