रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
कोकणच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांचा कायापालट करण्यासाठी आणि पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सोयींसाठी उभारण्यात येत असलेल्या बायो टॉयलेट व चेंजिंग रूमच्या विकासासाठी ४ कोटी रुपयांचा निधी अखेर वितरित करण्यात आला आहे.
यामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला आता गती मिळणार आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत हा निर्णय घेतला असून ३१ मार्च २०२६ रोजी तसा शासन निर्णयही निर्गमित केला आहे. या प्रकल्पासाठी एकूण ५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती, ज्यापैकी १ कोटी रुपये आधीच देण्यात आले होते.
आता उर्वरित ४ कोटींचा हप्ता रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याने प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे. या विशेष निधीतून जिल्ह्यातील सात महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांवर अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असणाऱ्या गणपतीपुळे आणि भाट्ये बीचसह गणेशगुळे, गावखडी, वेळणेश्वर, लाडघर आणि मुरूड अशा सात लोकप्रिय स्थळांची निवड करण्यात आली आहे.
या ठिकाणी एकूण १३ सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर आणि १३ सुसज्ज चेंजिंग रूम्स बांधले जाणार आहेत. ही प्रसाधनगृहे पूर्णपणे स्वयंचलित स्वच्छतेच्या सुविधेने सज्ज असल्याने समुद्रकिनाऱ्यांवरील अस्वच्छतेचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. तसेच समुद्रात भिजल्यावर व किनाऱ्यावर फिरल्यानंतर पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी दर्जेदार चेंजिंग रूम्स उपलब्ध होणार आहेत.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागलेल्या या प्रकल्पामुळे केवळ पर्यटकांनाच सुविधा मिळणार नाहीत, तर स्थानिक रोजगाराच्या संधींमध्येही मोठी वाढ होणार आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षातच ही सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारल्या जाणाऱ्या या सोयीसुविधांमुळे रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांचे रूप पूर्णपणे पालटणार असून, कोकणचा पर्यटन नकाशा अधिक समृद्ध आणि आकर्षक होणार आहे. पर्यटकांना या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे.