रत्नागिरी : रत्नागिरीच्या विमानतळावरून आगामी तीन महिन्यांत पहिले टेकऑफ होणार आहे. सर्व प्रशासनाने समन्वयाने काम केल्याने विमानतळाचे ७७ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी याच वर्षभरात रत्नागिरीमध्ये पंचतारांकित हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
रविवारी पार पडलेल्या रत्नागिरी विमानतळाकरिता भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यामध्ये सामंजस्य करार सहा झाला आणि तो करार परस्परहस्तांतरित करण्यात आला. एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या सामंजस्य करार कार्यक्रमाला आमदार किरण सामंत, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, आयसीजीएसचे कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंड्रे, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगारे, सिंधुदुर्ग योजनेचे उपाध्यक्ष विनय नातू, उपाध्यक्ष विलास चाळके, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, विमान कंपनीचे अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी, उद्योजक दीपक गद्रे, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, रमेश कीर आदी मान्यवर तसेच उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील संघटनांचे मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्याती ग्रुपमुळे देखणे विमानतळ
रत्नागिरीचे विमानतळ देखणे होण्यामध्ये न्याती ग्रुपचे मोठे योगदान असून, गुणवत्तापूर्ण काम या ग्रुपने केले असल्याचे सांगून पालकमंत्री न्याती ग्रुपचे कौतुक केले. रत्नागिरी विमानतळावरून विमान सेवा सुरू झाल्यानंतर जिल्ह्याचे अर्थकारण सुधारणार आहे. त्यामुळे आता पर्यटनातून विकास साधण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.
3 महिन्यांनी रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू होणार
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असताना तेथील चिपी विमानतळ सुरू झाले. रायगडचे पालकमंत्री असताना नवी मुंबईचे विमानतळ सुरू झाले. आता तीन महिन्यांनी रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आता आणखी कुठे नवीन विमानतळ सुरू करावे असेल तर मुख्यमंत्र्यांना सूचित करावे. दीपक कपूर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध असल्याने नवीन विमानतळाबाबत लक्षात ठेवावे, असे पालकमंत्री म्हणाले. सामंजस्य करार सोहळ्याच्या वेळी अध्यक्ष म्हणून असलेल्या पालकमंत्र्यांनी आजचा हा दिवस सर्वांसाठी सणवत असल्याचे सांगितले.