निवळीत गुटखा जप्त करण्यात आला 
रत्नागिरी

रत्नागिरी : निवळीत 8 लाखांचा गुटखा जप्त

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी - गणपतीपुळे मार्गावरील निवळी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत 8 लाख रुपयांचा विमल गुटखा पकडला. बोलेरो गाडीत हा गुटखा होता ते वाहनही जप्त करण्यात आले असून गुटखा मालकासह दोघा हमालांना अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. बोलेरो (एमएच 08 एपी 4545) ची किंमत 7 लाख रुपये असून, एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई करताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांसोबत अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षकही उपस्थित होते.

स्थानिक गुन्हा शाखेला निवळी फाटा येथील एका गोडावूनमधून गुटख्याची गाडी बाहेर पडणार असल्याची माहिती मिळाली. या खबरीनुसार पोलिस निरीक्षक जनार्दन परब यांच्या निर्देशानुसार पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, सहकारी हेडकॉन्स्टेबल शांताराम झोरे, सुभाष भांगणे, बाळू पालकर, विनोद कदम, योगेश शेट्ये, अतुल कांबळे या पोलिसांसह अन्न निरीक्षक विजय पाचुपते यांनी सकाळपासूनच फिल्डींग लावली होती. या कारवाईत गुटखा मालक संकेत चव्हाण(वय 20,रा. फणसोप सडा) आणि गाडीचा चालक विशाल घोरपडे(32, रा. फणसोप सडा, मुळ खटाव) आणि सुरज साळुंखे(वय 33, रा. झायरी, पुणे) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटखा भरलेली बोलेरो सकाळी 8.30 वा.च्या सुमारास निवळी फाटा येथे आली असता ती थांबवण्यात आली. बोलेरोच्या हौद्यात तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा मिळून आला.

SCROLL FOR NEXT