रत्नागिरी : पुणे येथील रांजणगाव एमआयडीसीतील प्रकल्पामुळे प्रदूषणाच्या त्रासामुळे ग्रामस्थ आंदोलन करत असून, यासंदर्भात पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे यांच्या उपस्थितीत येत्या पंधरा दिवसांत बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. येथील नागरकांनी गैरसमज करून घेऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रांजणगाव एमआयडीसीतील काही प्रकल्पांमुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यासंदर्भात आपल्याला बोलावले होते. त्यांच्या सूचनेनंतर आपण नदीची पाहणी केली होती. याला तीन-चार महिने झाले. याबाबत बैठक झाली नव्हती. हा विषय पर्यावरण मंत्रालयाशी निगडित आहे. त्यामुळे मंत्री पंकजा मुंढे यांनाही बोलवले जाणार आहे. येत्या पंधरा दिवसांत ही बैठक आयोजित केली जाईल. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांसह प्रमुख पदाधिकारी, यांना निमंत्रित केले जाईल. खासदार शरद पवार यांच्याशी आधी चर्चा केली जाईल, असे ना. उदय सामंत यांनी सांगितले.