Ramdas Kadam  Pudhari
रत्नागिरी

Ramdas Kadam | सुनिल तटकरे यांच्याकडे नेमका कोणता ‘जादूटोणा’? : कुटुंबाच्या राजकीय प्रभावावरून रामदास कदमांचा खोचक सवाल

भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाचे स्वागत; तटकरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावावर खोचक सवाल

पुढारी वृत्तसेवा

Ramdas Kadam Criticized Sunil Tatkare

खेड : भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर माजी मंत्री रामदास कदम यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत महायुतीतील राजकीय समीकरणांवर प्रश्न उपस्थित केले. बुधवारी (दि. १९) माध्यमांशी बोलताना कदम यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीतील कदम-तटकरे वादाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक आमदार असताना संख्याबळाचा विचार करता पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळायला हवे होते, अशी भूमिका कदम यांनी मांडली. असे असताना हे पद अदिती तटकरे यांना कोणत्या राजकीय गणितातून मिळाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘सुनील तटकरे यांच्याकडे खासदारकी, त्यांच्या कन्या मंत्री आणि पुन्हा कन्येलाच पालकमंत्रीपद’, असा टोला लगावत कदम यांनी तटकरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावावर निशाणा साधला. विधान परिषदेत शिवसेनेकडे अधिक संख्याबळ असतानाही तटकरे यांच्या मुलाला आमदारकी मिळाल्याचा दावा करत, तटकरे यांच्याकडे नेमका कोणता ‘जादूटोणा’ आहे, असा खोचक सवालही त्यांनी केला.

दरम्यान, भरत गोगावले यांच्यासारख्या ज्येष्ठ आमदाराला झेंडावंदनाच्या वेळी बाजूला उभे राहावे लागणे हे प्रोटोकॉलच्या दृष्टीने योग्य नव्हते, असेही कदम यांनी म्हटले. पालकमंत्रीपदाच्या निर्णयाबरोबरच प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरूनही त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचाही कदम यांनी उल्लेख केला. या प्रकरणातील काही घडामोडी तटकरे यांच्या विरोधातील राजकारणाशी संबंधित आहेत का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

एकीकडे तटकरे कुटुंबावर टीका करत असतानाच रामदास कदम यांनी भरत गोगावले यांचे पालकमंत्रीपद मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयावरून कदम यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणे आणि कदम-तटकरे यांच्यातील संघर्षाची चर्चा पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT