राजापूर : नजीकच्या चिरेखण फाटा येथे बुधवारी मध्यरात्री सागरी महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोन मोकाट गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण राजापूर तालुक्यात मोकाट गुरांचा प्रश्न चिघळलेला असताना, या घटनेने स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
अपघातानंतर तब्बल आठ ते दहा तासांपर्यंत या मृत गाय रस्त्याच्या कडेला तशाच पडून होत्या. सकाळी नऊ-दहापर्यंत एकही स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी न आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. हा भाग ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतो, त्या ग्रामपंचायतीतील कुणीही प्रतिनिधी या गंभीर प्रसंगात हजर न राहणं हा अधिकच धक्कादायक प्रकार ठरला.
दरम्यान, प्रांताधिकार्यांनी नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक गावात मोकाट जनावरांवर समिती गठीत करण्याच्या सूचनांनादेखील स्पष्टपणे केराची टोपली दाखवण्यात आल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. प्रशासनाच्या आदेशांचे पालन होत नसल्याने नागरिकांच्या जीवितासह मुक्या जनावरांचाही जीव धोक्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसपाटील व काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत गायींची विल्हेवाट लावली. मात्र दोन्ही गायींच्या कानात ओळख टॅग नसल्याने त्यांचे मालक कोण हेही स्पष्ट होऊ शकले नाही.
अशा बेवारस जनावरांना रस्त्यावर सोडणार्या मालकांवर कारवाई व्हावी अथवा या अपघातानंतर अज्ञात वाहनचालकासह संबंधित जबाबदारांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी अपेक्षा असताना तसे काहीही घडले नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींची बेफिकिरी आणि प्रशासनाची हातबलता पुन्हा एकदा समोर आली आहे. मोकाट जनावरे व जीवघेणे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.