राजापूर: राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह बौद्धवाडी आणि मधलीवाडी येथील अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच घरं फोडून अंदाजे सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याने स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री ही चोरी झाल्याने राजापूर पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.
चोरट्यांनी कोंड्ये हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक महाडेश्वर, ॲड. मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड आणि अविनाश रामचंद्र तावडे यांच्या घरांमध्ये प्रवेश केला. चोरीची माहिती मिळताच राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.
राजापूरमध्ये दीर्घ कालावधीनंतर अशी मोठी घरफोडी झाल्याने पुन्हा एकदा चोरट्यांनी तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. पाच घरांची एकाच रात्री फोडणी करून चोरट्यांनी पोलिसांसमोर गंभीर आव्हान निर्माण केले आहे. आता राजापूर पोलिसांनी या चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, चोरट्यांचे ठोस पुरावे मिळवणे आणि मुद्देमाल सापडणे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.