Rajapur Municipal Council
राजापूर : शहरातील मोकाट गुरांच्या वाढत्या समस्येवर राजापूर नगरपरिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेत विशेष धरपकड मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पकडण्यात आलेल्या १३ मोकाट गुरांची सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून चिपळूण येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली. गुरेमालकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले.
राजापूर शहरातील बाजारपेठ, प्रमुख रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाट गुरांचा वावर वाढल्याने व्यापारी, नागरिक, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. गुरुवारच्या आठवडा बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांनाही या समस्येचा फटका बसत होता. याशिवाय, मोकाट गुरांमुळे अनेक किरकोळ अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्याने ही समस्या गंभीर बनली होती.
यापूर्वी नगरपरिषदेकडून मोकाट गुरांची धरपकड करून ती संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच तीच गुरे पुन्हा शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरताना आढळल्याने प्रशासनाने यावेळी अधिक कठोर भूमिका स्वीकारली.
लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलीफे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून १३ मोकाट गुरांची धरपकड केली.
धरपकड करण्यात आलेली गुरे जुन्या रेस्ट हाऊस परिसरातील कोंडवाड्यात ठेवण्यात आली होती. सुमारे २० ते २५ दिवस नगरपरिषदेकडून त्यांना चारा, पाणी आणि आवश्यक देखभाल पुरविण्यात आली. घंटागाडीच्या माध्यमातून गुरेमालकांना वारंवार आवाहन करून दंड भरून गुरे ताब्यात घेण्यास सांगण्यात आले. काही गुरेमालकांनी दंड भरून आपली गुरे परत नेली असून भविष्यात गुरे मोकाट न सोडण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या.
मात्र, उर्वरित १३ गुरांचे मालक पुढे न आल्याने नगरपरिषदेकडून सर्व आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गुरांची वैद्यकीय तपासणी करून संबंधित विभागांशी आवश्यक पत्रव्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्यांची चिपळूण येथील गोशाळेत सुरक्षित रवानगी करण्यात आली.
दरम्यान, शहरातील मोकाट गुरांविरोधातील मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गुरेमालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत, अन्यथा नियमानुसार दंडात्मक तसेच कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.