Pudhari
रत्नागिरी

Rajapur News | 'खड्ड्यांचा ‘पुनर्जन्म’; ओणी–अणूस्कुरा मार्गाच्या दुरुस्तीचा लाखो रुपयांचा खर्च वाया

Oni Anuskura Road Potholes | ओणी–अणूस्कुरा मार्गावर बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा उघडू लागल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे

पुढारी वृत्तसेवा

Oni Anuskura Road Repair Issues

राजापूर : ओणी–अणूस्कुरा मार्गावर काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा उघडू लागल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या दुरुस्तीवर खर्च झालेले लाखो रुपये वाया गेल्याची टीका आता जोर धरू लागली आहे. पावसाळ्यापूर्वी या मार्गाचे संपूर्ण नूतनीकरण न झाल्यास आगामी काळात रस्ता पुन्हा खड्डेमय होऊन अपघातांचा धोका वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मागील पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. पावसाळा संपल्यानंतर ते बुजविण्यात आले; मात्र त्या कामाच्या गुणवत्तेबाबत तेव्हाही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता पुन्हा काही दिवसांतच खड्डे उघडू लागल्याने संबंधित विभागाच्या कामकाजावर शंका घेतली जात आहे.

राजापूर तालुका आणि कोल्हापूर यांना जोडणारा अणूस्कुरा घाटमार्ग सध्या अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. मुंबई, पुण्यासह लांब पल्ल्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर या मार्गाने होत असल्याने रस्त्यावरील ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत केवळ तात्पुरती मलमपट्टी करून खड्डे बुजविण्याऐवजी रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण आणि दुहेरीकरण करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

ओणीपासून अणूस्कुरा घाटापर्यंतचा हा मार्ग तालुक्यातील सुमारे ४० ते ५० गावांसाठी जीवनदायी ठरतो. त्यामुळे या मार्गाची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. वारंवार खड्डे पडत असल्याने आगामी पावसाळ्यात पुन्हा एकदा रस्त्याची दुरवस्था होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संपूर्ण मार्गाचे नव्याने, टिकाऊ स्वरूपात डांबरीकरण व रुंदीकरण करावे, अशी जोरदार मागणी पूर्व भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT