Upper Tehsildar Office 
रत्नागिरी

Ratnagiri Upper Tehsildar Office | रायपाटण अप्पर तहसीलदार कार्यालय विरोधासाठी दबावतंत्र; जनतेने अपप्रचाराला बळी पडू नये

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर केले आहे

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथे मंजूर झालेल्या अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी काही मंडळी दबावतंत्राचा वापर करत असून सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ओझरचे सरपंच विकास रेगे यांनी केला आहे. तसेच जनतेने अशा अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर केले आहे. त्यासंदर्भातील सूचना व हरकती मागविण्याची औपचारिक प्रक्रिया उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया कार्यालयाच्या अंतिम अंमलबजावणीसाठी असून रायपाटण आणि पाचल यापैकी एखाद्या ठिकाणाची निवड करण्यासाठी नसून फक्त रायपाटण येथे अप्पर तहसील कार्यालय अंतिम करण्यासाठीच काढण्यात आली असल्याचे सरपंच विकास रेगे यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या महसूल विभागाच्या विविध कामांसाठी नागरिकांना दूरवर प्रवास करावा लागत असून त्यात वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित झाल्यास राजापूर पूर्व विभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून शासकीय सेवा अधिक सुलभ आणि वेगवान होतील, असे त्यांनी सांगितले.

रायपाटण आणि पाचल ही गावे दळणवळणाच्या दृष्टीने जवळपास समान अंतरावर असल्याने स्थानिक नागरिकांच्या सोयीचा विचार करून शासनाने आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच रायपाटण येथे कार्यालय मंजूर केले आहे. गेली दोन वर्षे या संदर्भातील विविध स्तरांवरील कामकाज सुरू होते आणि त्यानंतरच शासनाने अंतिम निर्णय घेतल्याचे रेगे यांनी नमूद केले.

राजापूर पूर्व विभाग हा डोंगराळ आणि तुलनेने अविकसित भाग मानला जातो. या भागात प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अप्पर तहसीलदार कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने लाभदायक ठरणाऱ्या या निर्णयाला विरोध करण्याऐवजी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन विकास रेगे यांनी केले आहे. रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी होणारी धावपळ कमी होऊन प्रशासन लोकाभिमुख होण्यास मदत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT