हिरवाईने नटलेले डोंगर पर्यटकांना भुरळ घालत आहे. (Pudhari Photo)
रत्नागिरी

Raghuveer Ghat | रघुवीर घाट : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ

कोकणातील एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून रघुवीर घाट नवीन पर्यटन स्थळ उदयास येत आहे.

पुढारी वृत्तसेवा
अनुज जोशी

Raghuveer Ghat New Tourist Destination in Ratnagiri

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेला रघुवीर घाट सध्या कोकणातील एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार चारशे मीटर उंचीवर असलेला हा घाट परिसर थंड हवामान, हिरवाईने नटलेले डोंगर, आणि पावसाळ्यात वाहणाऱ्या धबधब्यांनी पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे.

पावसाळा सुरु होताच घाटावर पर्यटकांची वर्दळ वाढली असून, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा या शहरांसह परदेशातूनही पर्यटक येथे भेट देत आहेत. दरवर्षी लाखो पर्यटकांचा ओघ इथे पाहायला मिळतो. खोपी गावाच्या हद्दीत असलेल्या या घाटाचे सौंदर्य केवळ पावसाळ्यातच नव्हे, तर वर्षभर निसर्गप्रेमींना मोहवते.

रघुवीर घाट हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार मानला जातो. येथून कांदाटी खोऱ्यात जंगल सफारी सुरू करण्याची शक्यता असल्याने, वन्यजीव निरीक्षक आणि साहसप्रेमी पर्यटकांसाठीही हे एक महत्त्वाचे केंद्र ठरू शकते. घाटाच्या परिसरात असलेले घनदाट जंगल, विविध पक्षी प्रजाती आणि जैवविविधता निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरते.

खेड हे रघुवीर घाटासाठी सर्वात जवळचे शहर असून, कोकण रेल्वेवरील खेड रेल्वे स्थानक आणि खेड बस स्थानकातून घाटापर्यंत बस व स्थानिक वाहतूक साधनांची उपलब्धता आहे. खेड हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने खासगी वाहनांद्वारेही घाटापर्यंत सहज पोहोचता येते. रत्नागिरी (११६ किमी), पुणे (२९३ किमी), आणि मुंबई (३२८ किमी) हे प्रमुख विमानतळ घाटासाठी प्रवेशद्वार ठरू शकतात.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, निसर्गाने भरभरून दिलेला आणि पावसाळी पर्यटनासाठी स्वर्गवत वाटणारा रघुवीर घाट – निसर्गप्रेमींसाठी आणि पर्यटनप्रेमींसाठी खरोखरच एक आदर्श ठिकाण आहे.

रघुवीर घाट, जो महाराष्ट्रातील कोकण विभागात स्थित आहे, हा पश्चिम घाटाच्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. या भागात काही दुर्मिळ आणि स्थानिक गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या प्रजाती आढळतात, ज्यांचे वैज्ञानिक वर्णन २०१६ मध्ये करण्यात आले.

रघुवीर घाटात आढळणाऱ्या प्रमुख खेकड्यांच्या प्रजाती:

1. गव्हर्नेटोरिआना ठाकरेई (Gubernatoriana thackerayi)

ही प्रजाती रघुवीर घाटातच प्रथम नोंदवली गेली आहे. हिचे शरीर जांभळसर-लालसर रंगाचे असून चिमटे केशरी-लालसर असतात. ही प्रजाती केवळ या भागातच आढळते, त्यामुळे ती अत्यंत दुर्मिळ मानली जाते. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी खेकड्यांवर संशोधन करताना ही प्रजात जगासमोर आणल्याने त्यांच्या आडनावाचा या प्रजातीला मिळालेल्या वैज्ञानिक नावात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या खेकड्याना 'गव्हर्नेटोरिआना ठाकरेई' असे नाव मिळाले आहे.

पर्यटन विकासाची गरज 

रघुवीर घाट हा रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गावही याच मार्गावर आहे. त्यामुळे घाटाचा विकास करण्यासाठी सरकारकडून विशेष लक्ष दिल्यास, हे ठिकाण जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळवू शकते. स्थानिक तरुणांसाठी पर्यटन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देऊन रोजगारनिर्मितीही साधता येऊ शकते.

पर्यटन महामंडळाचे योगदान आवश्यक

पर्यटन विकास महामंडळाने जर येथे आवश्यक त्या सुविधा – माहिती केंद्रे, शौचालये, निवास व्यवस्था, आणि दृष्य बिंदू उभारल्या, तर रघुवीर घाट कोकणातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात एक नावाजलेले पर्यटनस्थळ ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT