How Ganpati Festival Celebrated In Konkan
रत्नागिरी : दीपक कुवळेकर
गणेशोत्सवाला अवघे चार दिवस असताना बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. रजा मिळो अथवा न मिळो, पण आठ दिवस गावाकडे गेल्याशिवाय कोकणी माणसाचे समाधान होत नाही. शुक्रवारपासून अनेकांनी गावची वाट धरली आहे. पण सध्या महामार्गाने येणार्या चाकरमान्यांची अवस्था बिकट बनली आहे. गेली अनेक वर्षे महामार्गाचे काम सुरूच आहे. तब्बल 16 वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनसुद्धा महामार्ग अजूनही अपूर्णच आहे. ही कोकणवासीयांसाठी शोकांतिका आहे. दुसर्या बाजूला बाप्पाच्या आगमनासाठी गावोगावी तयारी सुरू झाली आहे. सध्या मखर सजवण्याचे साहित्य घेण्याची धावपळ सुरू आहे. ठिकठिकाणी दुकानं सजली आहेत. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात गणेशोत्सव कसा साजरा केला जातो याचा घेतलेला आढावा...
प्रत्येक घरामागे एक गणपती
महाराष्ट्रातील सर्वात मोठा व आगळावेगळा सण म्हणजे गणपती. या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत धामधुमीने साजरा केला जातो. हा उत्सव दहा दिवसांचा असतो, गणपती ही ज्ञानाची देवता. गजानन हा विघ्नहर्ता मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याचा प्रघात आहे. कोकणातील हा सर्वात महत्त्वाचा सण असल्यामुळे जगाच्या पाठीवर असलेला कोणताही कोकणी माणूस या उत्सवासाठी आपल्या गावी जाण्यास उत्सुक असतो. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी खास रेल्वेसह बसेसची सोय केली जाते. कोकणात सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणतींची संख्या जास्त आहे. प्रत्येक घरामागे एक गणपती दिसतो.
कोकणात गणपती घरी कसा आणतात?
या सणाला शाडूच्या मातीच्या केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा गणपतीच्या मूर्ती बाजारात येतात. त्यापैकी एक घरी आणली जाते. गणपती आणावयास जातेवेळी लोक बरोबर ताम्हण, रूमाल घेऊन जातात. गणपती आणताना झाकून आणतात व गणपतीचे तोंड आपल्याकडे येईल असे पाहतात. गणपती आणतेवेळी गणपतीपुढे काही नाणी व गोविंद विडा ठेवून गणपती घरी आणावा, अशी पुष्कळ ठिकाणी पध्दत आहे. गणपती घरी आणल्यानंतर घराच्या दाराबाहेर गणपतीला तांदूळ व पाणी यांनी ओवाळून ते बाहेर टाकून देतात. नंतर गणपती आणणार्या व्यक्तीच्या पायावर गरम पाणी घालतात.
गणपती आणणार्या व्यक्तीला कुंकू लावतात, पाच सवाष्णी गणपतीला औक्षण करतात. पाटावर तांदूळ पसरून त्यावर गणपती ठेवून गणपतीची स्थापना करतात.
कोकणात घरगुती गणपती कसा साजरा करतात?
गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने करतात. यथासांग पूजा व आरती करून सकाळचा कार्यक्रम संपवतात. रोज सकाळी व सायंकाळी पूजा-आरती करून, केळे-पेरू वगैरे खिरापत संध्याकाळी आरतीचे वेळी देतात. गणपतीच्या पूजेसाठी नारळ, एकवीस मण्यांचे वस्त्र, फुले पत्री, शमी, दुर्गा, जानवे, गूळ-खोबर्याचा नैवेद्य, केवड्याचे कणीस इ. साहित्य लागते. गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सुपारीच्या गणपतीची स्थापना करून त्याची पूजा करण्यात येते.
या दिवशी मुख्यतः नारळ व गूळ यांच्या सारणाचे, तांदुळाच्या उकडीचे मोदक करतात. सार्वजनिक गणपती उत्सवामध्ये गणेशाच्या भव्य मूर्ती चौकाचौकांतून बसवतात व त्याची भव्य आरास करतात. लोक रात्रीच्या वेळी हे देखावे पाहण्यासाठी रस्तोरस्ती हिंडतात. संगीत, नृत्य, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नाटके वगैरे करमणुकीचे कार्यक्रम आखले जातात. त्याचबरोबर जाखडी ही संकल्पना सध्या अधिक लोकप्रिय ठरली आहे. शक्ती विरूद्ध तुरा असे सामने रंगतात. त्याचबरोबर भजनांचा कार्यक्रमही मोठा असतो.
गणपती आणि भजनाच्या डबलबारीचा सामना
भजनाच्याही डबलबारीचा सामना पाहायला मिळतो. यासाठी प्रेक्षकांची संख्याही खूप मोठी असते. साधारण पाच दिवसांचे गणपती गेल्यानंतर हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. कारण जिल्ह्यात सार्वजनिक मंडळेही फारच तुरळक आहेत. सार्वजनिक गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. काही लोकांकडे दीड दिवसांचा गणपती असतो, तर काही जणांकडे पाच दिवस असतो. तर काहीजणांचा गणपती गौरीबरोबर सातव्या दिवशी जातो. गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी नेहेमीप्रमाणे गणपतीची पूजा करतात. गणपतीच्या हातात गूळ-खोबरे व तिळाचा लाडू देऊन आरती करतात.
कोकणातील गणपती विसर्जनाची पद्धत काय?
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरांत गणपती मूळच्या जागेवरून हलवून ताम्हणात ठेवतात. वरील पूजा सोवळयाने करतात. नंतर गणपतीचे तोंड घरातील दाराकडे करून गणपतीची पाठ आपल्याकडे करून गणपती विहिरीवर, तळ्यावर, नदीवर, समुद्रावर विसर्जनासाठी नेतात. झांज घेऊन गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत जातात. तिथे परत गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला दुर्वा वाहतात, आरती करतात. यास उत्तरपूजा म्हणतात. विसर्जनाच्या वेळी गणपती दोनवेळा पाण्यातून बाहेर काढतात व तिसर्या वेळी पाण्यात सोडतात. नंतर नदीकाठची वाळू किंवा विहिरीजवळचे खडे आणून घरात चारही बाजूला टाकतात. समज असा आहे की, चारही बाजूला वाळू किंवा खडे टाकले असता जनावराची भीती नसते. गणपतीजवळ ठेवलेला नारळ नदीवर, विहिरीवर फोडावा. प्रसाद म्हणून खोबरे वाटतात. घरी आल्यावर सर्वांना प्रसाद व केलेली खिरापत देतात. गणपतीच्या विसर्जनानंतर घरी आल्यावर त्या कलशाची नेहेमीप्रमाणे आरती, मंत्रपुष्प म्हणून सांगता करण्याची पद्धत आहे.
कोकणात घरोघरी घरगुती गणेशोत्सवाची संख्या ही जास्त असते. सार्वजनिक गणपतींची संख्या ही फारच कमी असते. विशेष म्हणजे जिल्ह्यात यंदा गणेश मूर्तींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये घरगुती गणेश मूर्तींची संख्या 2 हजार 559 ने वाढली आहे. यावर्षी एकूण 1 लाख 69 हजार 416 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यातील 80 टक्के गणपती गौरी विसर्जनचे सात दिवसांचे असतात. तसेच यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही वाढ झाली आहे. यावर्षी 4 ने संख्या वाढली असून, 126 ठिकाणी सार्वजनिक गणपती विराजमान होतात.