Play Period board game
रत्नागिरी : मासिक पाळीबद्दलचा संकोच दूर करण्यासाठी दोन मैत्रिणींनी एकत्र येत एक अनोखा खेळ मांडला आहे. कविता सावंत आणि दिव्या सुब्रमण्यम या आर्किटेक्ट मैत्रिणींनी 'प्ले पिरीयड' (Play Period) हा अनोखा बोर्ड गेम तयार केला असून, रत्नागिरीतील काही प्रमुख शाळांमधील विद्यार्थिनींनी खेळता-खेळता शरीरातील बदलांचे धडे गिरवले आहेत.
रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग (UK) च्या सहकार्याने २०२३ पासून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. मासिक पाळीविषयक वैज्ञानिक माहितीचा अभाव असल्याने अेक मुली पाळीचं नाव ऐकलं तरी घाबरतात. त्यांची भीती घालवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे, हसतखेळत योग्य माहिती देणं. हेच ओळखून कविता आणि दिव्या यांनी दामले प्रशाला, रा. भा. शिर्के प्रशाला आणि जी.जी.पी.एस. रत्नागिरी या शाळांमध्ये कार्यशाळा घेतल्या.
हल्ली मुलींमध्ये वयात येण्याचे प्रमाण लवकर (Early Menarche) दिसून येत आहे. अगदी तिसरी-चौथीतील मुलींनाही या बदलांना सामोरे जावे लागते. या मुलींना हॉर्मोन्सचे बदल, शरीराची स्वच्छता, कापडी पॅडचा वापर आणि समाजातील गैरसमज याबद्दलची माहिती या बोर्ड गेमच्या माध्यमातून सोप्या शब्दांत दिली जात आहे. पाळीबद्दल लाज न बाळगता शास्त्रीय दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न या दोघींनी केला असून, त्याला विद्यार्थिनींकडून 'सॉलिड' प्रतिसाद मिळत आहे.