

रत्नागिरी : जि. प.मध्ये गतवेळी भाजपची रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एकही जागा निवडून न आल्याने यावेळीही भाजपचे पारडे रत्नागिरीत रिकामेच राहणार आहे. पं. स.मध्ये मात्र दोन जागा देण्यावर निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या इच्छुकांची जि.प.मध्ये स्वीकृतपदावर बोळवण केली जाणार आहे. भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी ‘भविष्याकडे’ पाहून निर्णय घेतले जात असल्याचे उत्तर मिळाल्याने, इच्छुकांवर तोंड दाबून गप्प बसण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी ठाकरे सेनेचे भास्कर जाधव वगळता चारही मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार आहेत. जिल्ह्यात भाजपचा सद्यस्थितीत एकही आमदार नाही. त्यातच न. पं. व नगर पंचायत निवडणुकीत भाजपला तडजोडीत न. पं.वर समाधान मानावे लागले. आता जि. प. निवडणुकीतही भाजपच्या वाट्याला अवघ्या सात जागा येणार असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असल्यामुळे नाराजी पसरली आहे. रत्नागिरी आणि लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपला जिल्हा परिषदेसाठी एकही जागा सोडण्यात आलेली नाही. परंतु पंचायत समितीत हाताच्या बोटावर जागा सोडण्यात आल्या आहेत.
रत्नागिरीमध्ये गतवेळी एकही जागेवर भाजप विजयी झालेली नव्हती. परंतु गतववेळी भाजपा स्वबळावर लढली होती. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. परंतु आता शिवसेना दुभंगली असल्याने भाजपलाही दोन ते तीन जागा मिळाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन रत्नागिरीत भाजपला उमेदवारी मिळावी, अशी मागणी करताना पारंपरिक गटांची मागणी केली होती. या गटांमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार तयारीही केली होती. परंतु भाजपच्या वरिष्ठांनीही या मागणीकडे लक्ष दिले नाही. उलट भविष्याचे राजकारण लक्षात घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.
रत्नागिरी पं. स.मध्ये भाजपला हरचिरी आणि वाटद गण सोडण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे. त्याचप्रमाणे जि. प.मध्ये भाजपच्या इच्छुकांना संधी देण्यासही सहमती दर्शवली आहे. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. परंतु शिवसेना कोणत्याही परिस्थितीत दहाच्या दहा जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त झाला आहे.