चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात एका अवघड वळणावर मासे वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताच्या ठिकाणी मासे भरलेले ट्रे बर्फासह रस्त्यावर पडले. त्यामुळे महामार्गावरून जाणार्यांची हे ताजे मासे घेण्यासाठी झुंबड उडाली होती.
ही घटना रविवारी (दि. 30) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. ताजे मासे रस्त्यावर पडल्याने अनेकांनी तेथे थांबून मासे लांबवले. काही कालावधीनंतर मात्र मासे वाहतूकदाराने दुसरी गाडी मागवून पडलेले चांगले मासे गाडीत भरून पाठवून दिले.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, या घटनेची नोंद पोलिस स्थानकात सायंकाळी उशिरापर्यंत झालेली नव्हती. दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याची परिस्थिती न कळल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.