Operator Dies in Factory Blast Khed Lote
खेड: खेड तालुक्यातील एमआयडीसी लोटे येथील ऑक्विला ऑरॉनिक प्रा. लि. कंपनीमध्ये रविवारी (दि.१८) दुपारी स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला . दिलीप दत्तात्रय निचते (वय ४७, रा. पिर लोटे, मुळगाव चालशेर, ता. शहापूर, जि. ठाणे) असे मृत कामगाराचे नाव आहे.
सध्या ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले निचते हे रविवारी दुपारी २.३६ च्या सुमारास कंपनीतील एस.पी. प्लांटमध्ये काम करत होते. यावेळी अचानक मोठा आवाज होऊन आग लागली. या आगीत ते गंभीर भाजले. तातडीने त्यांना घाणेखूंट येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलवले. मात्र, रस्त्यात प्रकृती खालवल्यामुळे त्यांना घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या दुर्घटनेमुळे लोटे एमआयडीसी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिक तपास करीत आहेत.