राजापूर अणुस्कुरा घाटातील रस्ता, तर दुसऱ्या छायाचित्रात ओणी-अणुस्कुरा रस्त्यात असे खड्डे पडल्याने वाहनचालकांची कसरत होत आहे. file photo
रत्नागिरी

Oni Anuskura State Highway - ओणी-अणुस्कुरा राज्य महामार्ग होणार अधिक सुसज्ज साडेतीनशे कोटींच्या निधीस मंजुरी

आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरातील महत्त्वपूर्ण अशा ओणी-पाचल-अणुस्कुरा या महत्त्वाच्या राज्य महामार्गासाठी साडेतीनशे कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याने या मार्गाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी निधी मंजूर झाला असून, त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांना गती मिळणार आहे.

ओणी-अणुस्कुरा या भागांना जोडणारा हा राज्य महामार्ग कोकणातील दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, एसटी बस आणि अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. मात्र पावसाळ्यात रस्त्याची झालेली दुरवस्था, खड्डे आणि काही ठिकाणचा अपुरा निचरा यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.

मंजूर निधीतून रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण, नवीन डांबरीकरण, पूल व संरक्षण भिंतींची उभारणी, गटारे, पावसाच्या पाण्याचा निचरा तसेच वाहतुकीसाठी आवश्यक आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित, वेगवान आणि दर्जेदार होणार आहे.

या निधीमुळे राजापूर तालुक्याच्या विकासाला नवी चालना मिळणार असून पर्यटन, शेती, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेषतः घाटमाथा आणि कोकणाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

राजापूर तालुक्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, मंजूर कामे गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT