उपमुख्यमंत्री अजित पवार  File Photo
रत्नागिरी

चिपळुणात राष्ट्रवादीची आज जनसन्मान यात्रा

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार दि. 21 सप्टेंबर रोजी चिपळूण दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर दुपारी 4 वा. जनसन्मान यात्रेनिमित्ताने जाहीर सभा होणार आहे. यावेळी अजित पवार काय बोलणार, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

महायुती सरकारच्या स्थापनेनंतर प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार चिपळूण दौर्‍यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत 21 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा. जनसन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. सावर्डे येथे दु. 3 वा. त्यांचे हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन होईल. यावेळी सावर्डे व कोंडमळा ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येईल. त्यानंतर ते चिपळूण येथील बहादूरशेख चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याचे दर्शन घेतील. त्यानंतर जिप्सी कॉर्नर येथे छ. शिवाजी महाराज पुतळ्याचे ते दर्शन घेतील आणि सायंकाळी 4 वा. इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रासमोरील मैदानात जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होईल. यावेळी प्रदेशाध्यक्ष व खा. सुनील तटकरे, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, मंत्री आदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, आजी - माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत.

यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची सभादेखील होणार आहे. या सभेनंतर सायंकाळी 7 वा. कापसाळ येथील माटे सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार विविध संघटना, कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी संवाद साधतील. यावेळी व्यापारी, बचाव समिती, विविध समाज संघटना, काजू-आंबा बागायतदार, शेतकरी व विविध संघटनांच्या बरोबर ते चर्चा करतील. तसेच अन्य राजकीय पक्षातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या गाठीभेटी ते घेतील. ज्या लोकांना आपली निवेदने द्यायची आहेत त्यांनी माटे सभागृहात सायंकाळी 7 वा. हजर राहावे, असे आवाहन देखील यावेळी आ. निकम यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT