Uday Samant
खेड : कोकणातील निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिक वनसंपदेवर विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यास न करता त्यावर संशोधन करावे. वन विभागाच्या माध्यमातून अशा अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या संस्था पुढे आल्यास त्यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच सिंधुरत्न योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून देतो, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
सात्विणगाव येथे उभारण्यात आलेल्या निसर्ग माहिती केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कोकणातील एका विद्यार्थ्याने स्थानिक पिकावर, विशेषतः नाचणीवर संशोधन करून पीएच.डी. केली असून त्याच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे, असा संदर्भ देत डॉ. सामंत म्हणाले की, विशिष्ट विषयांप्रमाणेच आपल्या निसर्गरम्य परिसरावरही उच्चस्तरीय संशोधन करता येते. रत्नागिरीच्या वनसंपदेचा, जैवविविधतेचा आणि वन्यजीवांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांसमोर आहे.
निसर्ग माहिती केंद्र हे केवळ माहिती पाहण्याचे दालन न राहता शिकवणारे आणि संशोधनाला चालना देणारे केंद्र झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ब्लॅक पँथर, व्हाईट टायगर, सिंह, बिबट्या यांसारख्या वन्यजीवांची वैशिष्ट्ये, त्यांची उत्पत्ती, अधिवास, भ्रमणक्षमता तसेच सह्याद्रीच्या खोऱ्यातील वाघांच्या भ्रमणाचा शास्त्रीय अभ्यास विद्यार्थ्यांना या माध्यमातून समजला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
“कोकणात आढळणाऱ्या पट्टेरी वाघाची भ्रमणक्षमता किती असते, तो कोणत्या मार्गाने भ्रमण करतो आणि पुन्हा एखाद्या ठिकाणी किती कालावधीनंतर येतो, यामागे शास्त्रीय कारण आहे. अशा प्रकारचे ज्ञान विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे,” असे डॉ. सामंत यांनी नमूद केले.
वन विभागावर आधारित स्वतंत्र अभ्यासक्रम किंवा संशोधन उपक्रम सुरू करण्यासाठी संस्था पुढे आल्यास त्यांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. डीपीसी तसेच सिंधुरत्न योजनेतून निधीची तरतूद करण्याचा शब्द जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निसर्ग माहिती केंद्र उभारण्याच्या उपक्रमाबद्दल विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्यासह वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. “देसाई मॅडम आणि लगड मॅडम यांचे कौतुक म्हणजे संपूर्ण वन विभागाचे कौतुक आहे,” असे सांगत त्यांनी वन विभागाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
निसर्ग माहिती केंद्राच्या माध्यमातून रत्नागिरीच्या जैवविविधतेची ओळख विद्यार्थ्यांना, नागरिकांना आणि पर्यटकांना होऊन भविष्यात संशोधनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही डॉ. सामंत यांनी व्यक्त केला. “या चांगल्या उपक्रमाचा शुभारंभ झाला असून तो अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे,” असे आवाहन करत त्यांनी आपल्या मनोगताचा समारोप केला.