Mandangad  
रत्नागिरी

Mandangad News| राष्ट्रीय महामार्गात प्रभावित मंडणगडातील गाळेधारकांना नोटीस

Mandangad News| आंबडवे-राजेवाडी फाटा महामार्गाचे काम शहरापर्यंत येऊन ठेपले; व्यापाऱ्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड : पुढारी वृत्तसेवा

अंतिम टप्प्यातील आंबडवे ते राजेवाडी फाटा या राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीट रस्त्याचे काम मंडणगड शहरापर्यंत येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गालगत असलेल्या शहरातील प्रभावित होणाऱ्या गाळेधारकांना दुकान गाळे हटवण्यासाठी प्रशासनाकडून नुकत्याच नोटीस बजावण्यात आल्या. त्यामुळे या समस्येवर उपाययोजनेसाठी व्यापारीवर्गाच्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग आंबडवे-लोणंद हा दुपदरी मार्ग मंडणगड शहरातील बाजारपेठेतून जात असल्याने या मार्गावरील मुख्य बाजारपेठेतील दोनशेहून अधिक दुकानदारांवर विस्थापित होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गेल्या चाळीस वर्षांपासून या दुकांनामध्ये किमान दोन पिढ्या विविध व्यापारी व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत असलेल्या दुकानदारांना बेरोजगारीला सामोरे जावे लागू शकते.

या समस्सेवर उपाययोजनेची आवश्यकता व्यक्त होत असताना रस्ते मार्ग व दुकाने या विषयावर योग्य तोडगा व सकारात्मकता आवश्यक आहे. बदलत्या काळात मंडणगड शहराचे बाजारपेठेतील नवे रुप देण्यात या खोकेधारकांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे किंवा या दुकानांमुळे बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

त्यातच २०१७ साली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे निर्मितीस गती आली व सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली. रस्त्याच्या वाढलेल्या रुंदीने शहरातील मार्गालगत असलेले दुकानगाळे, दुकाने प्रभाबित होणार आहेत.

समस्याग्रस्तांचे नव्याने व्यवस्थापन करण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पावले उचलण्याची नितांत आवश्यकता व्यक्त केली जात आहे. येथील दुकानदार आपलेच आहेत ही भावना तितकीच महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्यांना पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्याचेही उत्तरदायित्व पार पाडणे तितकेच आवश्यक आहे.

प्रदीर्घ काळ रखडलेल्या या रस्ते मार्गाच्या कामादरम्यान भविष्यात विकासकाम होत असतानाच शहरात निर्माण होण्याऱ्या समस्येवर उपाययोजना करावी, असे त्या त्याकाळी दुकानदारांसह सर्वच आघाडांना वाटले नाही हे नवल आहे. माध्यमांनी यावर वारंवार प्रकाश टाकला. रस्ते निर्मितीमुळे विकासाचे मार्ग प्रशस्थ होतात असे गृहीतक मांडले जाते.

शहरात काँक्रीटच्या प्रशस्त रस्त्याची निर्मिती होणे हे शहरीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र असे असले तरी रस्ते विकासाबरोबर स्थानिक व्यापाऱ्यांची दुकानांचे अस्तित्व व त्यामाध्यमातून निर्माण झालेले बाजारपेठेचे समायोजन रस्ते विकासाबरोबरच करणे आवश्यक आहे. यासाठी सकारात्मक भूमिका व समस्येवर योग्य उपाययोजना महत्वाची ठरेल, असे मत व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT