रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बनलेली महाविकास आघाडी कोलमडली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पुरस्कृत अपक्ष उमेदवारांनी आघाडी होण्यापूर्वी ठरल्याप्रमाणे उमेदवारी मागे घेतली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या 8 उमेदवारांच्या प्रभागात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार उभे असल्याने महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी बाहेर पडत असल्याचे काँग्रेसचे प्रदेश नेते रमेश कीर आणि राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी सांगितले.
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि मनसेची महाविकास आघाडी झाली. उमेदवारी अर्ज दाखल झाले तेव्हा आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 8 उमेदवारांच्या प्रभागांमधील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवारी दाखल झाली असल्याचे ‘उबाठा’चे उपनेते बाळ माने यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी बाळ माने यांनी ते उमेदवार आपले अर्ज मागे घेतील असे सांगितले होते.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी बाहेर पडली असून आता महाविकास आघाडी राहिली नसल्याचे कॉग्रेस नेते रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दोन्ही पक्षाचे नेते येत्या काही दिवसात चर्चा करुन प्रचारादरम्यान कोणत्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन करायचे याबाबत निर्णय होईल, हेही यावेळी सांगण्यात आले.